तिरुनेवेली (तामिळनाडू) – लेखिका अरुंधती रॉय यांनी लिहिलेले “वॉकिंग विथ द कॉम्रेडस’ हे पुस्तक तमिळनाडूतील मनोनमनियम सुंदरनार विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमातून हटवले आहे. द्रमुकच्या खासदार कनिमोळी करुणानिधी यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.
“जर साहित्य, कला आणि अभ्यासक्रम काय असावा, हे राजकारणाद्वारे ठरवले जाणार असेल तर ते वैविध्यपूर्ण समाजासाठी अतिशय धोकादायक आहे.’ असे कनिमोळी यांनी म्हटले आहे.
मनोमनमियम सुंदरनार विद्यापीठामध्ये 2017 साली इंग्रजी भाषेच्या कला शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी (एमए) अरुंधती रॉय यांच्या ‘वॉकिंग विथ द कॉम्रेड’ हे पुस्तक अभ्यासक्रमात समाविष्ट केले होते.
मात्र, या पुस्तकामध्ये अरुंधती रॉय यांनी आपल्या माओवादी संघटनांमधील प्रवासाचे वर्णन केले असल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या पुस्तकाला विरोध केला होता. अरुंधती रॉय यांनी या पुस्तकातून माओवादी चळवळीचे उदात्तीकरण केले असल्याचा आरोप अभाविपने केला आहे.
अभाविपने घेतलेल्या आक्षेपानंतर या पुस्तकाच्या अवलोकनासाठी एक समिती स्थापन केली गेली आणि गटचर्चाही आयोजित केली गेली होती. त्यासंदर्भातील बैठकीनंतर हे पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय घेतला गेला.