भारतीय सैन्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी अरुंधती रॉय यांनी मागितली माफी

नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी 2011 मध्ये भारतीय सैन्यावर केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी माफी मागितली आहे. 9 वर्षांपूर्वीचा त्यांचा हा व्हिडिओ अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर लोकांनी त्यांना निशाणा बनवले. त्यानंतर त्यांनी आपल्या या विधानावर द प्रिंटला दिलेल्या मुलाखतीत माफी मागितली. अरुंधती रॉय म्हणाल्या, आपण सर्वच जण जीवनात कधीतरी चुकून असे काही बोलून जातो जे मुर्खपणाचे असते, चुकीचे असते. माझ्या वक्तव्यामध्ये जर कोणालाही काही चुकीचे वाटले असेल तर मी त्यासाठी माफी मागते.

अरुंधती रॉय यांनी केलेल्या या वक्तव्याची व्हिडिओ क्‍लीप दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली असून यावरुन त्यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. नऊ वर्षांपूर्वी रॉय यांनी भारतीय सैन्यावर टिपण्णी करताना म्हटले होते, काश्‍मीर, मणिपूर, मिझोरात आणि नागालॅंड सारख्या राज्यांत आपण युद्ध लढत आहोत. 1947 पासूनच आपण काश्‍मीर, तेलंगाणा, गोवा, पंजाब, मणिपूर, नागालॅंडशी लढत आहोत. भारत एक असा देश आहे, ज्याने आपले सैन्य आपल्याच लोकांविरोधात तैनात केले आहे. पाकिस्तानने देखील अशा प्रकारे आपले सैन्य आपल्या लोकांच्याविरोधात उभे केले नाही. ईशान्य भारतात आदिवासी, काश्‍मीरात मुस्लिम, पंजाबमध्ये शीख आणि गोव्यात ख्रिश्‍चनांशी भारत देश लढत आहे. त्यामुळे असं वाटतंय की ही राज्ये सवर्ण हिंदूंची राज्ये आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.