सातारा तालुक्‍यात कृत्रिम “पाणीबाणी’

प्राधिकरणाला जाग कधी येणार?
प्राधिकरणाच्या भानगडीमुळे उपनगरात खडखडाट
संदीप राक्षे

सातारा – सातारा आणि तालुक्‍यात खासगी टॅंकरचे दर वाढले असून 5 हजार लिटरच्या एका टॅंकरसाठी सहाशे रुपये मोजावे लागत आहेत. यंदा एल निनोच्या प्रभावाने मॉन्सून सरासरी 96 टक्के आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीनंतर जिल्ह्यात दुष्काळाचे गांभीर्य प्रकर्षाने समोर आले आहे. सातारा तालुका पूर्व कोरेगाव उत्तर खंडाळा व वाई तालुक्‍याचा पश्‍चिम भाग येथे तब्बल 218 खाजगी टॅंकर सुरु असल्याची माहिती आहे.

खासगी टॅंकरचे पाणी मिळणेही कठीण होणार आहे. सातारा शहरात पालिकेतर्फे 4 टॅंकरद्वारेच पाणीपुरवठा सुरू असून, या पाण्यासाठी पैसे घेणे थांबविण्यात आले आहे. मात्र टॅंकरच नादुरूस्त असल्याने साताऱ्यात कृत्रिम पाणीबाणी तयार झाली आहे. सातारा व तालुक्‍यातील रहिवाशांना बारामही पाण्यासाठी बोअर किवा खासगी टॅंकरवरच अवलंबून राहावे लागते. सातारा तालुक्‍यात तेरा विंधन विहरी असून त्या अधिग्रहीत झाल्या तरी घटत्या भूजल पातळीचा त्यांना फटका बसला आहे. गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे परिसरातील बहुतांश बोअरचे पाणी जानेवारी महिन्यानंतरच आटले. सातारा जिल्हा परिषदेने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे, मात्र तो अपुरा आहे. त्यामुळे खासगी टॅंकरशिवाय पर्याय नाही. सातारा खंडाळा माण व उत्तर कोरेगाव, या चार ठिकाणी पाण्याने तळ गाठला आहे. नागरिकांची येथे पाण्यासाठी वणवणं सुरू आहे. आदी ठिकाणांहून हे खासगी टॅंकरचालक पाणी आणतात.

काही दिवसांपूर्वी चारशे रुपयांना टॅंकर मिळत होते. ते वाढून पाचशे रुपयांवर गेले. मागच्या आठवड्यापासून सहाशे रुपयांना एक टॅंकर पाणी विकण्यात येत आहे. तेही वेळेवर मिळत नाही. टॅंकर भरण्यात येणाऱ्या विहिरींतील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे तेथे टॅंकर भरण्यास वेळ लागतो. पूर्वी दिवसभरात आठ फेऱ्या करणारे टॅंकर आता चार फेऱ्या करत आहेत. टॅंकरचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून, जास्तीत जास्त पैसा पाण्यासाठीच खर्च होत आहे.

जिल्ह्यात दुष्काळ झळा तीव्र आहेत. ग्रामीण भागात पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे खासगी टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका आर. एस. पाटील यांनी सांगितले. किमान शाळेसाठी तरी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. पूर्वी टॅंकरचे दर कमी होते, मात्र आता आम्ही जेथून पाणी आणतो त्या विहिरीच्या मालकाने पाण्याचे दर वाढवले आहेत. त्याचबरोबर डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे टॅंकरच्या दरात वाढ झाली असल्याचे सांची वॉटर सप्लायर्सचे श्रीकृष्ण मोरे यांनी सांगितले. यंदा सरासरीच्या पर्जन्यमानामुळे बळीराजा धास्तावला आहे. मान्सून काळात पाऊस पडला नाही, तर पैसे घेऊनही पाणी देणे शक्‍य होणार नसल्याचे ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.