Singer Asha Bhosle : खरंच असं होईल का? असं झालं तर किती छान होईल. पुन्हा नव्या उमेदीने आपल्या आशाताई परत आपल्या सोबत येतील आणि त्याच प्रखर ऊर्जेने तमाम भारतीयांना त्यांच्या सुमधुर गाण्यांनी मंत्रमुग्ध करतील… आशाताई त्यांच्या नावातच आशा आहे त्या निराश कशा राहतील ? नाही त्या कधीच निराश राहिल्या नाहीत.. अनंत अडचणी आणि आभाळा एवढं दुःख पचवून सुद्धा सतत हसत राहणाऱ्या जगाला कायम आनंदी राहण्याचा, सकारात्मक राहण्याचा मूलमंत्र देऊन आशाताई आपल्यातून चटका लावून निघून गेल्या… तब्बल आठ दशक गाणं हाच त्यांचा श्वास होता आणि ते गाणं थांबलं आणि श्वासही थांबला… आशाताई म्हणजे अजब रसायन होतं.अखेरच्या श्वासापर्यंत त्या गाणं म्हणत होत्या. स्टेज शो करत होत्या आणि गाणं म्हणताना स्टेजवर नाचत पण होत्या.. हे कसं शक्य आहे एवढी ऊर्जा एवढी सकारात्मकता कुठून आली हा प्रश्न अजूनही पडतो… त्यांचे असंख्य फोटो आहेत पण प्रत्येक फोटो चा विशेष म्हणजे त्यांचा हसरा चेहरा एकाही फोटोत दुःखी अथवा चिंताग्रस्त असा चेहरा शोधून सापडणार नाही.. या होत्या खऱ्या आशाताई… मंगेशकर घराण्याचा सांगितीक वारसा अगदी समर्थपणे आशाताईंनी पुढे चालवला. आशाताईंनी पार्शवगायनाला सुरुवात केली तेव्हा गानकोकिळा लता दिदी या आपल्या समृद्ध गायकीने सिनेसृष्टी गाजवत होत्या. सोबतच गीता दत्त, शमशाद बेगम, सुरय्या,राजकुमारी यांची पण गाणी गाजत होतीच.या अशा आव्हानात्मक परिस्थितीत आपल्या दमदार, कसदार आणि टोकदार समर्थ गायकीने स्वतःचा स्वतंत्र ठसा आशाताईंनी उमटवला आणि तब्बल १२००० पेक्षा जास्त गाणी गाण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.जवळपास २० भाषांमधून ९०० चित्रपटांमधून ही गाणी आशाताईंनी गायली… सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात आशा भोसलेंना आणि त्यांच्या आवाजाला खरी ओळख देण्याचं महत्त्वाचं काम खऱ्या अर्थाने पार पाडलं दिग्गज संगीतकार ओ पी नय्यर यांनी. ५०-६० च्या दशकात जवळपास प्रत्येक संगीतकारांनी लतादीदींना घेऊन अनेक गाणी गाऊन घेतली पण ओपी हे एकमेव संगीतकार होते ज्यांनी दीदींचा आवाज आपल्या संगीतात कधीच वापरला नाही आणि जास्तीत जास्त त्यांनी आशाताईंचा आवाज वापरला आणि पुढे जो काही इतिहास घडला सगळ्यांना ठाऊकच आहे. एकाहून एक सुरेल श्रवणीय आणि दर्जेदार गाणी ओपींनी आशाला दिली आणि आशाने अक्षरशा त्या संधीचं सोनं केलं. ओपींनी संगीतबद्ध केलेली आशाची गाणी आजही आपल्या ओठावर रूळतात आणि आपल्याला ठेका घ्यायला भाग पडतात. आओ हुजूर तुमको सितारों में, आईये मेहरबान, जाइये आप कहा जायेंगे, ये हैं रेशमी जुल्फो का, चैन से हमको कभी, यही वो जगह है या आणि अशी अनेक सुंदर अवीट गाणी ओपींनी आशाताईंकडून कडून गाऊन घेतली आणि एका नव्या गायिकेचा उदय झाला.जिने तिथून पुढली सहा ते सात दशक हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं आणि करोडो भारतीयांच्या मनावर गारुड केलं.. त्यानंतर मात्र आशाताईंनी मागे वळून पाहिलं नाही. हिंदी चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायनाचा तो जणू काही सुवर्णकाळच होता. त्याकाळी आघाडीच्या प्रत्येक संगीतकाराने आशाताईंकडून एकाहून एक सुरेल गाणी गाऊन घेतली. ओपींव्यतिरिक्त आशाताईनी जास्तीत जास्त गाणी गायली ती म्हणजे आरडी बर्मन आणि एसडी बर्मन यांच्याकडे…७०-८० चे दशक गाजवलं आशा आणि आरडी या अफलातून कॉम्बिनेशन नी आणि सोबत होते किशोरदा.. आशाचे अनेक सोलो आणि किशोर सोबत चे युगलगीत ज्यांना आरडीने संगीतबद्ध केलं ती अतिशय गाजली.. आपण बघतोच अनेक अभिनेते किंवा अभिनेत्री पडद्यावर सुंदर अभिनय करतात पण गाण्यातून अभिनय करणं हे फक्त आशाताईंना जमलं एवढेच नाही तर त्या गाण्याचा शब्दार्थ आपल्या स्पष्ट शब्दोच्चा रातून व्यक्त करणे,तसेच त्या गाण्यातला भावार्थ त्या गाण्यातले भाव आणि आणि चित्रार्थ म्हणजेच पडद्यावर जी कोणती अभिनेत्री आहे अगदी हुबेहूब तिचा आवाज असा त्रिवेणी संगम म्हणजेच आशाताई.. का रे दुरावा का रे अबोला – रुसलेल्या प्रियकराला विनवणारा आर्त स्वर.. झुक झुक झुक आगीनगाडी – निरागस निर्मळ सुंदर असा बालिश आवाज. या सुखांनो या, फुलले रे क्षण माझे – नववधुचा उल्हासित आवाज. अच्छा जी मैं हारी, तुम जियो हजारो साल, हाल कैसा हैं जनाब का मधील लाडीक मधाळ स्वर, ये मेरा दिल प्यार का, पिया तू अब तो आजा – मधील मादक स्वर मागे उभा मंगेश, हरीनाम मुखी रंगते, मला हे दत्तगुरु दिसले मधील भक्तीरसात न्हाऊन निघालेला स्वर, हतुबा हतुबा, परदे में रहने दो मधील अरबी टोन मधील हुबेहूब आवाज सलोना सा सजन है दिल चीज क्या है, मधील अभिजात गजल गायकी तरुण आहे रात्र अजूनही केव्हा तरी पहाटे मधील प्रणयाधीन स्वर असे अनेक भावाविभोर करणारे अभिनय आपल्या गाण्यातून सहजगत्या सादर करणाऱ्या आपल्या आशाताई. मराठीमध्ये आशाताईंना पुढे आणण्याचं काम त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर तसेच बाबूजी उर्फ सुधीर फडके यांनी केलं. या दोघांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी अजरामर झाली आहेत. तरुण आहे रात्र अजूनी केव्हा तरी पहाटे जिवलगा राहिले दूर घर माझे गेले द्यायचे राहून चांदणे शिंपीत जाशी, ही वाट दूर जाते ही गाणी हृदयनाथ मंगेशकर जी सोबत तसेच या सुखांनो या, विकत घेतला श्याम,थकले रे नंदलाला,कारे दुरावा, जिवलगा कधी रे येशील तू ही गाणी बाबूजी ने स्वरबद्ध केलेली गाणी विशेष गाजली. अनेक हालअपेष्टा,कष्ट नकार, अवहेलना,दुःख हे सारं सहन करून सुद्धा जिते हैं शान से मरते हैं शान से म्हणत म्हणत आशाताईंनी अलविदा केलं.. आपण सहन केलेल्या दुःखाचं त्यांनी कधीच भांडवल केलं नाही हसत हसत त्या सामोरे गेल्या हे सर्व काही त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.. हिंदी गाण्यातील पार्श्वगायनाचे तीन आधारस्तंभ लतादीदी रफी साहेब आणि किशोरदा आधीच गेले आणि आज हा चौथा आधारस्तंभ पण निखळला त्यामुळे पार्श्वगायनाचं क्षेत्र खऱ्या अर्थाने आज पोरकं झालं.. आशाताई आज आपल्यात नाहीत पण राहून राहून त्यांचं गाणं अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही मनात रेंगाळत आहे… राहुल सराफ, नागपूर