नवी दिल्ली : राज्यघटनेचे कलम 370 पुन्हा लागू होणार नाही, अशी भूमिका गुरूवारी भाजपने मांडली. तसेच, जम्मू-काश्मीरमधील सत्तारूढ इंडिया आघाडीवर विधानसभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावावरून टीकेची झोड उठवली. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करावा या मागणीचा ठराव त्या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेत बुधवारी मंजूर झाला.
त्यावरून भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीला लक्ष्य केले. जम्मू-काश्मीर विधानसभेत मंजूर करण्यात आलेला ठराव म्हणजे भारताच्या विभाजनाचा प्रयत्न आहे. मात्र, तो प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. संसद आणि सर्वोच्च न्यायालयाने कलम 370 हटवण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा अनादर आणि अवमान ठरावाच्या मंजुरीने झाला.
संबंधित कलम हटवण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांत ७० टक्क्यांनी घट झाली. तशा प्रकारच्या घटनांत जीवितहानी होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांनी कमी झाले, असा दावा त्यांनी केला. जम्मू-काश्मीरमधील सत्तारूढ आघाडीचा दहशतवादाला पाठिंबा आहे का? ती आघाडी जम्मू-काश्मीरमधील जनतेसाठी नव्हे; तर स्वत:च्या भल्यासाठी विशेष दर्जाची मागणी करत आहे, असा आरोपही स्मृती यांनी केला.