चौकातून सटकला अन्‌ कागदपत्रांमुळे अडकला

चिंचवड पोलिसांची कामगिरी : दोन चोरट्यांकडून आठ दुचाकी हस्तगत 

पिंपरी – वाहतूक पोलिसांनी थांबविल्यामुळे कागदपत्र आणतो, असे सांगून तो तेथून सटकला. मात्र चिंचवड पोलिसांनी केलेल्या वाहनाच्या तपासणीत त्याचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड मिळून आले. त्या कागदपत्राच्या आधारे तपास केला असता तो तरुण वाहनचोर असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदाराला पकडून चोरीच्या तब्बल आठ दुचाकी जप्त केल्या. अंकुश बालाजी क्षीरसागर (रा. कस्पटे वस्ती, वाकड. मूळ रा. परभणी), प्रदीप संजय माळी (रा. कस्पटे वस्ती, वाकड. मूळ रा. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सहाय्यक निरीक्षक अभिजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार मारुती फलके चिंचवड स्टेशन येथील महावीर चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी आरोपी अंकुश (एमएच-14-ईव्ही-4334) दुचाकीवरून आला. संशय आल्याने फलके यांनी दुचाकी अडवली व कागदपत्रांबाबत चौकशी केली. ती दुचाकी मित्राची असून कागदपत्रे आणून दाखवतो, असे सांगून तो चौकातून निसटला. संध्याकाळपर्यंत तो न आल्याने फलके यांनी ती दुचाकी चिंचवड पोलीस ठाण्यात जमा केली.

चिंचवड पोलिसांनी तपासणी केली असता गाडीच्या पेट्रोलच्या टाकीच्या कव्हरमधून अंकुशचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड ही कागदपत्रे मिळाली. त्यावरून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने ती दुचाकी कोल्हापूर येथील मित्र प्रदीप याच्यासोबत मिळून चिंचवडमधून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी प्रदीपलाही अटक केली. दोघांनी चिंचवड, भोसरी, हिंजवडी परिसरातून अडीच लाखांच्या आठ दुचाकी चोरल्याची कबूली दिली.

या कारवाईमुळे चिंचवड पोलीस ठाण्यातील दोन, भोसरी एमआयडीसी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. एमएच-14-एफझेड-1346, एमएच-14-बीझेड-1383, एमएच-14-जीजे-2684 आणि एमएच-03-सीजे-3291 या चार दुचाकींच्या मालकांचा शोध पोलीस घेत आहेत. वरिष्ठ निरीक्षक भीमराव शिंगाडे, निरीक्षक (गुन्हे) विश्‍वजित खुळे, चिंचवड वाहतूक विभागाचे निरीक्षक खंडेराव खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अभिजीत जाधव, कर्मचारी पांडुरंग जगताप, मारुती फलके, सुधाकर अवताडे, स्वप्निल शेलार, ऋषिकेश पाटील, नितीन राठोड, गोविंद डोके, अमोल माने, सचिन वर्णेकर, पंकज भदाणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)