जांभळाची आवक वाढली

आरोग्यवर्धक असल्याने चांगली मागणी

पुणे – गोड चवीचे, मधुमेह रोगावर गुणकारी असलेले जांभुळ म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा जांभळाची मार्केटयार्डातील फळविभागात आवक वाढली आहे. गुजरात येथील बडोदा, अहमदाबाद भागातून दिवसाला सरासरी 500 ते एक हजार किलो इतकी आवक होत असल्याची माहिती जांभळाचे व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली.

साधारणपणे दरवर्षी 15 मार्चच्या सुमारास जांभळाची आवक सुरू होत असते. मात्र, यावर्षी ती 25 दिवस आधीच झाली होती. 20 फेब्रुवारीच्या आसपास पहिली आवक झाली होती. त्यावेळी जांभळाला घाऊक बाजारात प्रती किलोला 151 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला होता. त्यानंतर आता आवक वाढली आहे. रविवारनंतर (दि.21) जांभळाची आवक आणखी वाढेल. दररोज सुमारे 2 ते 3 टन आवक होईल. सध्या जांभळाला बाजारात दर्जानंतर 120 ते 150 रुपये भाव मिळत आहे. जून-जुलैपर्यंत जांभळाचा हंगाम सुरू राहणार आहे.

कर्नाटकातूनही सध्या तुरळक प्रमाणात आवक होता आहे. पंधरा ते वीस दिवसानंतर महाबळेश्‍वर, मान आणि कोकणातून गावरान जांभळाची आवक सुरू होईल. त्यावेळी भावात आणखी घट होईल, असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. गुजरातच्या जांभळाविषयी सुपेकर म्हणाले, “गुजराती जांभळाला अधिक गर असतो. इतर जांभळापेक्षा हे जांभुळ अधिक गोड, आकाराने मोठे आणि दिसायला आकर्षक असते. त्यामुळे या जांभळाला जास्त मागणी असते. परिणामी, त्याची बाजारात चांगली चलती असते. खरेदीदार ते मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.