हिमालयातून कृष्णाकाठावर पाहुण्यांचे आगमन

विनोद मोहिते
चिखल्या, पांढरा धोबी पक्षी दाखल

इस्लामपूर – हवामान बदलाने महिनाभर लांबलेल्या स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाची उत्सुकता महाराष्ट्रातील पक्षीप्रेमींना होती. एक महिना उशिरा का होईना तुतवार, छोटा कंठेरी चिखल्या, पांढरा धोबी, पिवळा धोबी, करडा धोबी, पिवळा धोबी अशा पाणथळीच्या पक्षांचे हजारो मैलाचा प्रवास करून कृष्णाकाठावर आगमन झाले आहे. गतवर्षी च्या तुलनेत यंदा पक्ष्यांची संख्या घटल्याचे चित्र आहे.

हिवाळ्यात कृष्णाकाठावर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन यावर्षी पावसाळा दीर्घकाळ राहिल्याने लांबले. चोचीचे करकोचे, पांढऱ्या मानेचे करकोचे, रंगीत करकोचे, गोताखोर, अवाक, चमचे, सुरय, स्थानिक स्थलांतरित पक्षीही कृष्णाकाठावर लक्ष वेधत आहेत. यंदा ऋतूमानात झालेल्या बदलाचा मोठा फटका पक्ष्यांच्या स्थलांतरावर झाला आहे. या वातावरण बदलानंतर आता मात्र येणाऱ्या काळात दवात नाहलेल्या पाणवट्यावर पक्षांचा किलबिलाट निनादणार आहे.
हिवाळ्यात ध्रुवीय प्रदेशात दिवस लहान होत जातो.

बर्फवृष्टीमुळे अनेक वनस्पती, कीटक बर्फाखाली गाडले जातात. त्यामुळे या ठिकाणाहून पक्षी अन्नाच्या शोधात सुरक्षित कृष्णाकाठावर स्थलांतर करत असतात. असा अनेक वर्षे नित्यक्रम आहे. ऊसपट्टा जास्त असल्यामुळे तसेच कृष्णा नदीच्या उथळ पाणवठ्यावर या पक्ष्यांना मुबलक प्रमाणात अन्नही उपलब्ध आहे.

त्यामुळे ध्रुवीय प्रदेशातून हजारो मैलांचे अंतर कापून पक्षी कृष्णा नदीच्या काठावर येतात. यावर्षी कृष्णा नदीच्या परिसरात सॅंड पाईपर, चिखल्या तसेच विविध प्रकारचे परीटपक्षी पहायला मिळत आहेत. तसेच स्थानिक पक्षीही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. किलबिलाटाने कृष्णाकाठाकडे सर्वांचे लक्ष केंद्रित होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.