मुंबई – बहुप्रतिक्षेनंतर बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात “सुलतान’ या नर वाघाचे आगमन झाले आहे. राष्ट्रीय उद्यानाचे वन्यजीव बचाव पथक त्याला घेऊन नागपूरहून मुंबईला आज सकळी घेऊन आले आहे. मात्र, पर्यटकांना लगेच सुलतान वाघाचे दर्शन होणार नाही. कारण, हा वाघ केवळ प्रजोत्पादनाच्या हेतूने आणण्यात येणार असल्याने त्याला व्याघ्र सफारीत प्रदर्शित करण्यात येणार नाही.
बोरिवली नॅशनल पार्कमधील व्याघ्र सफारीत गेल्या कित्येक वर्षांपासून पाळणा हललेला नाही. सध्या या सफारीत चार मादी आणि एक नर वाघ आहे. त्यामधील तीन माद्या या प्रजननाच्या दृष्टीने सक्षम आहेत. मात्र, याठिकाणी असलेल्या नर वाघाकडून प्रजननाचे प्रयत्न असफल झाले. त्यामुळे आता “सुलतान’ या नव्या वाघाला प्रजोत्पादनाच्या अनुषंगाने आणण्यात आले आहे. नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रातून या वाघाची रवानगी मुंबईला करण्यात आली आहे.