पाटसमध्ये पावसाचे जोरदार आगमन

वरवंड – दौंड तालुक्‍यातील पाटस, रोटी, कुसेगाव आणि परिसरातील गावांत आज (दि. 7) पावसाचे आगमन झाले. यामुळे गेले अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पाटस येथे जोरदार वारे आणि पावसाच्या हजेरीने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावर्षीच्या उन्हाळ्यात दौंड तालुक्‍यातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. पाणी टंचाईमुळे पिके जळून गेली, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, तसेच शेतकऱ्यांसमोर जनावरे कशी जगवायची, हा मोठा प्रश्‍न पडला होता.यामुळे पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा शेतकरी करीत होते. जून महिना सुरू झाला तरी पाऊस न आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

पाटस येथे वेगवान वारे वाहत होते. या वाऱ्यासोबत पावसाचेही आगमन झाल्याने सर्वांची धावपळ झाली. वारे आणि पावसाच्या जोरामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे नुकसान झाले. नागरिकांना पावसापासून बचाव करण्यासाठी हॉटेल, दुकाने, पूल अशा ठिकाणांच्या आडोश्‍याला थांबावे लागले. अनेक दुकाने आणि हॉटेल्समधील बाहेर ठेवलेल्या वस्तू, तसेच टेबल, खुर्च्या वाऱ्यामुळे उडून दूरवर गेल्या.

पाच वाजण्याच्या सुमारास पाटस गावासह तालुक्‍यातील रोटी, कुसेगाव आदी गावांत जोरदार पावसाचे आगमन झाले. जोरदार पाऊस पडल्याने सर्वत्र पाणी वाहताना दिसत होते. वातावरणात गारवा पसरला होता, यामुळे उन्हाळ्यातील प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जनावरांचा चारा, कांद्याच्या वखारी पावसामुळे भिजू लागल्याने ताडपत्री टाकून झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.