तुरुंगाचे गज कापून पळालेल्या आरोपींना अटक

संगमनेर – संगमनेर येथील कोठडीचे गज कापून पळालेल्या दोन आरोपींना काही तासांतच पकडण्यात पोलिसांना यश आले. शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास तुरुंगाचे गज कापून आरोपींनी पलयान केले होते. या घटनेने पोलीस ठाण्याच्या आवारात एकच गोंधळ उडाला होता.

विशाल दत्तात्रय तांदळे (वय 22, रा. मंचर ता.आंबेगाव जि. पुणे) आणि कलीम अकबर पठाण (वय 20, रा. निंबाळे, ता.संगमनेर) अशी त्यांची नावे आहे. हे दोघे न्यायालयीन कोठडीत असताना या दोघांनी हेक्‍सा पानाने बराकीचे तीन गज कापून व बंदोबस्तावरील गार्डला धक्का मारून पळून गेले. या बराकीत एकूण 11 आरोपी कैदेत होते. त्यामुळे इतर आरोपींनी पळून जाण्यास मदत केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आरोपी कोठडीतून पळताच बंदोबस्तावरील गार्डसनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. त्यानंतर या घटनेची माहिती बिनतारी यंत्रणेच्या माध्यमातून गस्तीवर असलेल्या विविध पथकांना देण्यात आली. त्यानुसार पळालेल्या आरोपींचा शोध सुरू झाला. त्याच दरम्यान पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम व संजय कवडे या अधिकाऱ्यांसह पो. कॉ.साईनाथ तळेकर, सुभाष बोडखे, सागर धुमाळ, अजय आठरे, निलेश धादवड, अमृत आढाव, विजय पवार, गणेश बोरसे, राजेश डोंगरे व नितीन शिंदे यांनी ओरापींचा माग शोधीत त्यांना अकोले रस्त्यावर जेरबंद केले. यातील विशाल तांदळे याने यापूर्वी राजगुरूनगर पोलिसांच्या कोठडीतून खिडकीचे गज कापून पलायन केले होते.

संगमनेरच्या कारागृहातून यापूर्वी आरोपी पळून गेल्याच्या घटना घडल्या आहे. या प्रकाराची पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात यांनी गंभीर दखल घेतली चौकशीचे आदेश दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)