सौदीत जाऊन बलात्काराच्या आरोपीला अटक

तिरुवअनंतपूरम – केरळमधील कोल्लम पोलीस स्थानकातील आयुक्त मेरिन जोसेफ यांनी सौदी अरेबियामधील रियाधमध्ये जाऊन भारतातून पळून गेलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे. जोसेफ त्यांची टीम आणि इंटरपोलचे काही अधिकारी 14 जुलै रोजी रियाधला गेले होते. लहान मुलांवर बलात्कार केल्याप्रकरणी फरार असलेल्या सुनील कुमार भाद्रान या इसमाला अटक करण्याची जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आखण्यात आली होती.

कोल्लम येथील असणारा सुनील हा सौदी अरेबियामध्ये लाद्या बसवण्याचे काम करतो. 2017 साली सुनीलने त्याच्या मित्राच्या भाचीवर तीन महिने अत्याचार केले. या प्रकरणात या मुलीच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु झाला. मात्र पोलिसांनी सुनीलला चौकशीसाठी नोटीस पाठवण्याआधीच तो सौदी अरेबियामध्ये पळून गेला.

परदेशात जाऊन एखाद्या आरोपीला अटक करणे सोपी गोष्ट नसते. मात्र, आम्ही हे काम अगदी चोखपणे पार पाडले. सौदीमधील इंटरपोल, भारतीय दूतावास, आंतरराष्ट्रीय तपास समिती, गुन्हेअन्वेषण खाते या सर्वांना अनेक कागदपत्रे द्यावी लागली. बराच पाठपुरावा करावा लागला.

सौदी अरेबियामधून भारताकडे हस्तांतरित करण्यात आलेला सुनील हा पहिलाच भारतीय आरोपी ठरला आहे. या प्रकरणात जलद सुनावणी करण्यात यावी अशी विनंती आम्ही न्यायालयामध्ये करणार आहोत. हे प्रकरण सर्व गुन्हेगारांमध्ये कायदा कोणालाही सोडत नसतो असा संदेश देणारे ठरेल, असा विश्‍वास जोसेफ यांनी व्यक्त केला. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होऊ लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.