पुणे(प्रतिनिधी) – दुचाकीवरुन रॅम्बो चाकू घेऊन फिरणाऱ्यास समर्थ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून रॅम्बो चाकू आणि दुचाकी असा 20 हजार 350 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. राहुल शिवशंकर परदेशी(19,रा.गवळी वाडा, खडकी) असे आरोपीचे नाव आहे.
समर्थ पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रतिबंधक पथकातील पोलिस शिपाई हेमंत पेरणे, सचिन पवार, दत्ता सोनवणे, सुभाष मोरे, पोलिस हवालदार सुशील लोणकर यांच्यासह गस्त घालत होते. त्यांना सोमवार पेठेतील ससून क्वॉर्टर जवळ राहुल संशयास्पदरित्या अॅक्टीव्हा दुचाकीवरुन जाताना दिसला. त्यांनी त्याला थांबवून गाडीची डिक्की उघडून तपासणी केली. यावेळी त्यामध्ये एक धारदार रॅम्बो चाकू सापडला. त्याला विचारणा केली असता, तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. यामुळे त्याला ताब्यात घेऊन शस्त्र बंदीचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
यासाठी पोलिस शिपाई हेमंत पेरणे यांनी फिर्याद दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे , सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलिस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल मोहिते यांनी केली.