जुन्नर येथे एटीएम फोडणारी टोळी जेरबंद

जुन्नर – शहरातील एटीएम फोडण्याच्या प्रयत्न जागरूक नागरिकांच्या तत्परतेमुळे अयशस्वी ठरला. या परिसरातील हिताची कंपनीचे एटीएम फोडून पैसे लांबविण्याच्या उद्देशाने आलेल्या 10 पैकी 7 दरोडेखोरांना पकडण्यात जुन्नर पोलिसांना यश मिळाले असून पोलिसांच्या वेगवान हालचालींमुळे रक्‍कम चोरण्यात टोळी अयशस्वी ठरली असून उर्वरीत तीन अरोपींना लवकरच पकडले जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी दिली.

कांताराम महाबरे, युवराज साळवे, रेहान उर्फ बच्चू हसन सय्यद (सर्व रा. जुन्नर), संकेत गायकवाड (रा. खानापूर,जुन्नर), ज्ञानेश्‍वरवार खेडे, भीम भोईर, योगेश लिहे (रा. सर्व वेळे, ता. मुरबाड) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जुन्नर शहराच्या जुन्या बस स्थानक परिसरातील व नवीन प्रवेशद्वारा शेजारील एटीएम मंगळवारी (दि. 16) रात्री अज्ञात चोरटे फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती एका जागरुक नागरिकाने जुन्नर पोलिसांना फोनवरून दिली. त्यानंतर तातडीने पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांना दोघे युवक एटीएमच्या बाहेर दिसले. पोलीस आल्याची चाहूल लागताच गजाच्या सहाय्याने एटीएम फोडण्याच्या प्रयत्नातील पाचजण बाहेर पळाले. यापैकी दोघांना जागेवरच पकडण्यात आले व उर्वरित पाच जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या पाच जणांपैकी पोलिसांनी पाठलाग करून तिघांना पकडले असून उर्वरित दोघांना बुधवारी (दि. 17) अटक करण्यात आली. आरोपींकडील हत्यारे तसेच दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

या दबंग कारवाईत पोलीस निरीक्षक युवराज मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद साबळे, पोलीस हवालदार राजेंद्र बुरुड, पोलीस नाईक मुकुंद मोरे, संदीप लोहकरे, कॉन्स्टेबल भरत सुर्यवंशी, प्रशांत पवार, सुनील काटे, गणेश जोरी, बुरुडे, पोलीस मित्र मोहन चकवे, ज्ञानेश तांबडे आदींनी भाग घेतला होता. इतर 3 फरारींचा जुन्नर पोलीस शोध घेत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)