भरदिवसा घरफोडी करणारा जेरबंद

4 लाख 17 हजाराचा ऐवज हस्तगत

पुणे – भरदिवसा घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून 4 लाख 17 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला.  शशिकांत अनंत माने (24,रा.हाकेनगर, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सहकारनगर पोलीस ठाण्यात एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता. यामध्ये फियादी महिला दुपारी घरास कुलूप लावून बाहेर गेल्या असता, चोरट्याने घरातील 107 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख दिड लाखाचा ऐवज चोरला होता.

यागुन्हयाचा तपास करत असताना पोलीस नाईक संदीप ननवरे व भुजंग इंगळे यांना खबर मिळाली की माने हा मांजरी फार्म येथे नातेवाईकांना भेटण्यास येणार आहे. त्यानूसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

त्याची चौकशी केली असता, त्याने एक घरफोडी व तीन वाहनचोरी असे चार गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्यावर आजवर शहर, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण परिसरात घरफोडी, वाहनचोरी, जबरी चोरी, दरोडा असे एकुण 28 गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभिरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस हवालदार बापु खुटवड, विजय मोरे, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, भुजंग इंगळे, सदिप ननवरे, सतिश चव्हाण, महेश मंडलिक, देवा चव्हाण, प्रदिप बेडिस्कर, शिवलाल शिंदे, प्रदिप शिंदे यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.