पत्रकारावर खूनी हल्ला करणारा दीड वर्षांनी जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

पुणे – शिरवळ येथे पत्रकारावर खुनी हल्ला करून दीड वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले. शफीक रफिक शेख असे त्याचे नाव आहे. त्याने 11 एप्रिल 2019 रोजी नामांकित वृत्तपत्राच्या वार्ताहरावर हल्ला केला होता.

पोलीस उपनिरीक्षक नितिन शिंदे हे पथकातील कर्मचाऱ्यांसह गुन्ह्यास प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख आणि सचिन पवार यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, खंडाळा तालुक्‍यातील शिरवळ येथे एका पत्रकारावर खुनी हल्ला करून फरार असलेला शेख कात्रज बायपास चौकाजवळ मित्राला भेटायला जाणार आहे. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांना कळविण्यात आली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी कारवाई करून त्याला ताब्यात घेतले.

त्यावेळी केलेल्या चौकशीमध्ये सत्तुर आणि चाकुच्या सहाय्याने पत्रकारावर हल्ला केल्याचे त्याने कबूल केले. त्याच्यावर शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, कट रचणे आणि विविध कलमानुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याच्या साथीदारांना पोलिसांनी यापूर्वीच जेरबंद केले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अर्जुन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन शिंदे, तपास पथकाचे अंमलदार संतोष भापकर, रविंद्र भोसले, सोमनाथ सुतार, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे आणि विक्रम सावंत यांनी ही कारवाई केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.