Pune | पोलीसांची वर्दी घालून रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा मुख्य सुत्रधार अटक; ‘अशी’ करायचे प्रवाशांची लूट

पुणे – पुणे रेल्वे स्टेशन येथे पोलिसांची वर्दी परिधान करून परप्रांतीय प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. यातील एका मुख्य आरोपीस लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्याच्या पाच साथिदारांचा शोध सुरु आहे. स्थानकावरील पोलिसांचा बंदोबस्त कमी होताच, ही टोळी पोलिसांचा वेशात दाखल होत होती. दरम्यान, वाढत्या तक्रारिंची दखल घेत लोहमार्ग पोलिस अधिक्षक सदानंद वायसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बनावट पोलिसांची टोळी शोधण्यात यश आले.

तब्बल 72 सीसीटीव्हीद्वारे तपासणी –

रेल्वे स्थानकावरील सर्व फलाटांवर एकूण 72 सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. हे सर्व सीसीटीव्ही तपासण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी सात पथके तयार केली. यामध्ये पोलिसांच्या वर्दीत दोन संशयीत हालचाल करणआऱ्या व्यक्ती दिसल्या. आम्ही ते आमचे पोलिस कर्मचारी आहेत का? याची तपासणी केली. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यांपैकी हे दोघेही न्हवते. यामुळे लुबाडणुकीच्या प्रकाराशी पोलिसांचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाले, असे रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रवाशांच्या तक्रारी –

परप्रांतीय कामगारांचे साहित्य तपासणी करण्याचा बाहणा करत तुम्ही गांजा लपवून ठेला आहे, तो ताब्यात द्या, असे म्हणत त्यांच्याकडील रोकड लुटली जात होती. काही प्रवाशांना गाडीचे तिकीट व बसायला जागा मिळवून देतो, असे सांगत त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. यासंदर्भात परप्रांतीय प्रवाशांकडूनही पोलिसांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी येत होत्या.

रेल्वे प्रशासनाची पोलिसांकडे धाव –

यंदा लाॅकडाऊन सुरु होताच, मागील काही दिवसांत पुणे, पिंपरी चिंचवड शहरात राहणारे परप्रांतीय कामगार त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानक गाठत होते. नेमका याच गोष्टीचा फायदा उठवत, ही बनावट पोलिसांची टोळी कार्यरत झाली. या टोळीने रेल्वे स्थानकावर लुटालुट सुरु केल्यावर पोलीस प्रवाशांची रोकड लुटत आहेत, अशा तक्रारी मध्य रेल्वे प्रशासनाने लोहमार्ग पोलिसांकडे केल्या होत्या. त्यांनी संबंधित पोलीस कर्माचऱ्यांचा शोध घेण्याची मागणी जीआरपीकडे केली होती. त्यानुसार तपास केला असता, या बोगस पोलिसांचे कारनामे समोर आले आहेत. असे सांगण्यात आले.

अशी करायचे लूट –

पुणे रेल्वे स्थानकाच्या बहादुर मिलच्या बाजूच्या प्रवेशद्वाराकडून आरोपील रेल्वे स्थानकात दाखल होत होता. आरोपी दुष्काळग्रस्त भागातील असून तो चार वर्षांपूर्वी पुण्यात आला होता. त्याचे सर्व साथीदार मराठवाड्यातील असून ते पळून गेले आहेत. या आरोपींनी अशाच प्रकारे मागील दोन वर्षात अनेकांना लुबाडले आहे. यामुळे तपास न लागलेल्या केसेस संदर्भात नव्याने तपास करण्यात येईल. स्ध्या पोलिसांनी आरोपी व त्याच्या पाच सहकाऱ्यांवर दोन गुन्हे दाखल केले आहेत.

पोलीस अधीक्षक म्हणतात –

यासंदर्भात माहिती देताना पोलीस अधीक्षक वायसे म्हणाले, हे पोलीस कर्मचारी नसल्याचे स्पष्ट झाल्यावर आम्ही त्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. फलाटावर आम्ही आमचे पोलीस कर्मचारी साध्या वेशात ठेवले. दोन आठवड्यांपूर्वी जीआरपीने पोलीस काॅन्स्टेबलच्या गणवेशातील मुख्य आरोपीस ताब्यात घेतले. त्याने ज्या टेलरकडून कपडे शिवले होते, त्या टेलरच्या दुकानांचीही माहिती मिळाली आहे. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने 17 परप्रांतीय प्रवाशांना पोलीस असल्याची बतावणी करत लुटल्याची कबुली दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.