आचारसंहितेपूर्वी मंजूर कामे मार्गी लावा

उदय कबुले; स्थायी समिती सभेत पुन्हा स्वच्छतेचा विषय ऐरणीवर

सातारा -करोना काळात विकासकामांना कमी निधी मिळाला असला, तरी मंजूर कामे आचारसंहितेपूर्वी मार्गी लावा, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी प्रशासनाला दिली. दरम्यान, स्थायी समिती सभेत जिल्हा परिषदेच्या स्वच्छता ठेक्‍याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. याबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती सौ. कल्पना खाडे, संजीवराजे नाईक निंबाळकर, भीमराव पाटील, दीपक पवार, शिवाजी सर्वगौड, जयवंत भोसले, सौ. सुवर्णा देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव व खातेप्रमुख उपस्थित होते.

गेले दीड वर्ष करोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात विकासकामांना थोडा ब्रेक लागला होता. आता परिस्थिती नियंत्रणात आल्याने मंजूर कामे प्रशासनाने तात्काळ मार्गी लावावीत, अशी मागणी सदस्यांनी केली. काही महिन्यांनी आचारसंहिता लागणार असल्याने ही कामे तात्काळ पूर्ण करण्याची सूचना कबुले यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या स्वच्छतेच्या ठेक्‍याचे काय झाले, असा प्रश्‍न दीपक पवार यांनी केला.

त्यावर, संबंधित ठेकेदाराची मुदत मार्च 2022 पर्यंत असून, याबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, असा खुलासा कार्यकारी अभियंता अभय पेशवे यांनी केला. जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची कमतरता नसल्याने कामे आणखी गतीने व्हावीत, अशी अपेक्षा कबुले व विधाते यांनी व्यक्त केली. सभेच्या विषयपत्रिकेवरील आणि ऐनवेळचे सर्व विषय मंजूर करण्यात आले. मनोज जाधव यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.

पोळतात्यांच्या नावाची शिफारस
माण पंचायत समितीच्या सभागृहाला माजी आमदार सदाशिवराव पोळ यांचे नाव देण्याचा ठराव पंचायत समितीने केला आहे. हा ठराव शिफारशीसह शासनाकडे पाठवण्यास स्थायी समितीने एकमताने मंजूरी दिली. सोनाली पोळ यांच्या गैरहजेरीत त्यांच्यावतीने प्रदीप विधाते यांनी हा विषय मांडला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.