जप्त केलेल्या वाहनांची होतेय अडचण : मार्चमध्ये लिलाव
पिंपरी – पिंपरी-चिंचवड, मोशी येथील उपप्रादेशिक कार्यालयाला जुन्या आणि जप्त केलेल्या वाहनांनी गराडा घातला आहे. आरटीओ कार्यालयाकडून कागदपत्रात त्रुटी, अबकारी कर व विविध नियमांचे उल्लंघन केल्याने या वाहनांची जप्ती करण्यात आली आहे. जप्त केलेल्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरटीओ कार्यालयाभोवती जागा शिल्लक राहिली नसल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे येथील वाहन चाचणी ट्रॅक व इतर कामांसाठी जागा उपलब्ध नसल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालय परिसराला जप्त केलेल्या वाहनांचा विळखा पडला आहे. त्यामुळे कार्यालयाला इतर कामांसाठी जागा पुरत नसल्याने मोठी अडचण होत आहे. गेल्यावर्षी जप्त केलेल्या व कायदेशीररित्या नोटीस बजावलेल्या एकूण 51 वाहनांचा जुलै महिन्यात लिलाव करण्यात येणार होता. मात्र, त्यापैकी केवळ 25 वाहनांचाच लिलाव झाला. यातून आरटीओ कार्यालयाला 25 लाख 4 हजार शंभर रुपये मिळाले तर, 7 वाहनामालकांनी 13 लाख 51 हजार 268 रुपयांचा कर भरणा करून वाहने सोडवून नेली होती.
“आरटीओ’ला एकूण 38 लाख 55 हजार 368 रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. तर, 20 वाहनांना योग्य मूल्य न मिळाल्याने त्यांचा लिलाव होऊ शकला नाही. आजघडीला आरटीओ कार्यालयात शंभर वाहने जप्त केली. त्यापैकी 90 वाहनांचा मार्च महिन्यात सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून लिलाव करण्यात येणार असल्याचे आरटीओ कार्यालयाच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सरगे यांनी सांगितले. जप्त वाहनांमुळे वाहन चाचणी ट्रॅक व अन्य कामासाठी कार्यालयाला त्रास होत आहे. यामुळे लवकरच कायदेशीर बाबी पूर्ण करून येत्या मार्च महिन्यापर्यंत वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.
असा होतो जप्त वाहनांचा लिलाव
आरटीओ कार्यालयाच्या वतीने जप्त करण्यात आलेल्या वाहन धारकांना पाच नोटीस दिल्या जातात. जे वाहनमालक कार्यालयाने सांगितलेल्या अटी व औपचारिकता यांची पूर्तता करतात, त्यांना त्यांची वाहने परत केली जातत.
वाहनमालकांकडून आवश्यक प्रतिसाद न मिळाल्यास पाचव्या नोटीस अखेर संबंधित वाहनांचे आयुर्मान व मूल्यांकन करून वाहनाची किंमत काढली जाते. त्यानंतर अशा वाहनांचा जाहीर लिलाव केला जातो. या लिलावात जी व्यक्ती जास्त किंमत देईल त्या व्यक्तीस ती गाडी विकण्यात येते.
आजघडीला कार्यालयाच्या परिसरात जप्त केलेली जवळपास शंभर वाहने आहेत. या वाहनांचा लिलाव येत्या मार्चपर्यंत करण्यात येणार आहे.
– विनोद सरगे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी