मुंबई : देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘आरोग्य सेतू अॅप’चा वापर करण्यासाठी केंद्र सरकारने वेळोवेळी आग्रह धरला आहे. मात्र सरकारला या अॅपच्या निर्मात्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) इलेक्ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय आणि ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर’ (एनआयसी) यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या वरुनच आता विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली असून शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आरोग्य सेतूही देवाची करणी आहे असा चिमटा भाजपाला काढला आहे.
Everything is an “Act of God” in this government. pic.twitter.com/mMx4cAAIgD
— Priyanka Chaturvedi (@priyankac19) October 28, 2020
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासगी-सरकारी भागीदारीद्वारे विक्रमी वेळेत (२१ दिवस) आरोग्य सेतू अॅप ‘एनआयसी’द्वारे विकसित करण्यात आले. त्यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात आली असून, अतिशय पारदर्शक पद्धतीने हे अॅप तयार करण्यात आले, असे स्पष्टीकरण इलेक्ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने निवेदनाद्वारे दिले. हे अॅप सुमारे १६.२३ कोटी जणांनी वापरले असून, करोनाविरोधी लढयास मदत झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र त्याचे निर्माते कोण आहेत याबद्दल माहिती नसल्याचा दावा एनआयसीने आणि इलेक्ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय यांनी माहिती आयोगासमोर केला आहे. यावरुनच आता आरोग्य सेतू कोणी तयार केले यावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक केंद्रीय मंत्र्यांनी ‘आरोग्य सेतू अॅप’चा वापर करावा असे आवाहन केले होते. असे असताना आता एनआयसीने आणि इलेक्ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयालाच ‘आरोग्य सेतू अॅप’चा वाली कोण हे ठाऊक नसणे अत्यंत धक्कादायक असल्याचे मत सोशल नेटवर्किंगवर व्यक्त केले जात आहे. अनेकांनी या सुनावणीनंतर आता ही गोष्टही देवाची करणी म्हणून कारण देऊन विस्मरणात जाईल असा टोला केंद्र सरकारला लगावला आहे.
काही आठवड्यांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीसाठी अॅक्ट ऑफ गॉड म्हणजेच देवाची करणी कारणीभूत असल्याचे वक्तव्य केलं होतं. त्याच्याच आधारे आता ‘आरोग्य सेतू अॅप’लाही असेच कारण सरकार देईल अशापद्धतीची टीका सोशल नेटवर्किंगवर होत आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही या सुनावणीसंदर्भातील बातमीचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत, “या सरकारच्या कामकाजामध्ये सर्व काही अॅक्ट ऑफ गॉडच आहे,” असा टोला लगावला आहे. तर युथ काँग्रेसचे कर्नाटकमधील नेते श्रीवत्सा यांनीही ट्विटरवरुन आरोग्य सेतू अॅप हे अॅक्ट ऑफ गॉड आहे असे ट्विट केले आहे.