खडकी येथे 30 खाटांचे विलगीकरण कक्ष
पुणे – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लष्करातर्फेही विविध प्रयत्न केले जात आहेत. यासाठी देशात विविध ठिकाणी क्वारंटाइन सुविधा उभारण्यात येत आहेत. याच श्रृंखलेत पुण्यातील खडकी येथील दारूगोळा निर्मानी कारखान्यात लष्करातर्फे 30 खाटांचे विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशांतून येणाऱ्या नागरिकांसाठी लष्कराकडून स्वतंत्र सुविधा उभारण्यात येत आहेत. स्वतंत्र उपचार केंद्र आणि विलगीकरण कक्षाचा समावेश आहे. लष्करातर्फे सर्वांत पहिले केंद्र दिल्लीजवळील माणेसर येथे उभारण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयातर्फे आणखी काही विलगिकरण कक्ष उभारण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत दारूगोळा फॅक्टरी बोर्डातर्फे देशातील विविध कारखान्यांमध्ये सुमारे 285 खटांचे विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. यामध्ये पुण्यातही येथे 30 खाटांचे कक्ष उभारण्यात आले आहे. याठिकाणी करोना संशयित रुग्णांना ठेवण्यात येणार आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव ही राष्ट्रीय आपत्ती झाली आहे. याचा सामना करण्यासाठी फॅक्टरी बोर्डदेखील सज्ज होत आहे. त्यासाठीच विलगीकरण कक्ष उभारले जात असून, यामाध्यमातून सध्या उपलब्ध आरोग्यसुविधांवरील ताण कमी करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे फॅक्टरी बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.