जम्मू – जम्मू-काश्मीरमध्ये गुरूवारी दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत एका लष्करी अधिकाऱ्याला वीरमरण आले. त्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.
राजौरी जिल्ह्यातील थानामंडी परिसरात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये राष्ट्रीय रायफल्सचा एक अधिकारी जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले.
मात्र, त्या अधिकाऱ्याचे प्राण वाचू शकले नाहीत. चकमक झाली त्या ठिकाणी आणखी दहशतवादी असल्याच्या शक्यतेने सुरक्षा दलांची शोधमोहीम रात्री उशीरापर्यंत सुरू होती. थानामंडी परिसरात चालू महिन्यात झडलेली ही दुसरी चकमक ठरली. याआधी 6 ऑगस्टला झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ते पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा संघटनेचे सदस्य होते.