“सी-डॅक’च्या मदतीने प्रणाली केली विकसित
पुणे – विधानसभा निवडणुकीमध्ये सीमेवरील जवानांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने “सी-डॅक’च्या मदतीने इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेट पोस्टल बॅलेट सीस्टीम (ईटीपीबीएस) ही प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमुळे जवानांना ई-मेलद्वारे मतपत्रिका पाठविली जाणार आहे. ई-मेलची प्रिंट काढून जवान मतदान करून ती मतपत्रिका पुन्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवणार आहेत. यामुळे पोस्टल सैनिकांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा 15 दिवसांचा कालावधी वाचणार आहे. त्यामुळे सैनिकांनी केलेले मतदान संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे वेळेत पोहोचणार आहे.
मागील लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच “ईटीपीबीएस’ या प्रणालीचा वापर करून मतपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. अधिकाधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी निवडणूक आयोग विशेष प्रयत्न करत आहे. पूर्वी अंतिम मतदार यादी तयार झाल्यानंतर मतपत्रिका छापून ती पोस्टाद्वारे संबंधित सैनिकांपर्यंत पाठविण्यात येत होती. सैनिकांपर्यंत मतपत्रिका काहीवेळा वेळेत पोहोचत नव्हती. पोस्टाद्वारे मतपत्रिका सैनिकांपर्यंत पाठविण्याच्या पारंपरिक पद्धतीमध्ये बदल करण्यात आला असून “ईटीपीबीएस’ प्रणालीद्वारे मतपत्रिका पाठविण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाकडून सैनिक मतदारांची यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात 4 हजार 972 सैनिक मतदार होते. आता यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.