लष्कराचे हेलिकॉप्टर धरणात कोसळले; जम्मू-काश्‍मीरमधील दुर्घटना

नवी दिल्ली – भारतीय लष्कराचे एक हेलिकॉप्टर मंगळवारी धरणात कोसळले. जम्मू-काश्‍मीरच्या कठुआ जिल्ह्यात घडलेल्या त्या दुर्घटनेनंतर तातडीने शोध आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले.

लष्कराच्या ध्रुव जातीच्या हेलिकॉप्टरने पंजाबच्या पठाणकोटमधून उड्डाण केले. काही कालावधीनंतर ते धरणाचा भाग असलेल्या मोठ्या तलावात कोसळले. ते ठिकाण पठाणकोटपासून 30 किलोमीटर अंतरावर असल्याचे समजते.

दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट असल्याची माहिती मिळाली. दुर्घटनेची माहिती समजताच बचाव पथके रवाना करण्यात आली. लष्कराचे प्रशिक्षित पाणबुडे आणि नावाही बचाव आणि शोधकार्यात सहभागी झाल्या.

शोधपथकांना हेलिकॉप्टरचे काही अवशेष आणि इतर काही वस्तू पाण्यात आढळल्याचे समजते. दुर्घटनेनंतरचा अधिक तपशील समजण्यास वेळ लागण्याची शक्‍यता आहे. कमी उंचावरून घिरट्या घालत असताना हेलिकॉप्टर कोसळले. मात्र, कुठल्या कारणामुळे ती दुर्घटना घडली ते अद्याप समजू शकले नाही. हेलिकॉप्टर पाण्यात कोसळल्यानंतर प्रचंड आवाज झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.