काठमांडू- नेपाळच्या दौऱ्यावर असलेले भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांना आज नेपाळच्या अध्यक्षा बिद्या देवी भंडारी यांच्या हस्ते नेपाळच्या लष्कराचा जनरल हा मानद बहुमान एका विशेष समारंभामध्ये प्रदान करण्यात आला. अनेक दशकांपासूनच्या या परंपरेनुसार भारत आणि नेपाळ दरम्यानचे संबंध दृढ असल्याचेच प्रतिबिंबित झाले.
अध्यक्षांच्या ‘शितलनिवास’ या अधिकृत निवासस्थानी झालेल्या समारंभात बिद्यादेवी भंडारी यांनी जनरल नरवणे यांना तलवार, सन्मानचिन्ह व मानपत्र प्रदान केले. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली, भारतीय राजदूत विनय एम क्वात्रा आणि दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी या समारंभास उपस्थित होते. परदेशाच्या लष्कर प्रमुखांना मानद जनरल श्रेणीच्या बहुमनाने सन्मानित करण्याची प्रथा नेपाळमध्ये 1950 सालापासून सुरू झाली. हा मानद जनरल बहुमान प्राप्त झालेले जनरल मनोज नरवणे हे भारताचे पहिले लष्कर प्रमुख आहेत.
नेपाळचे लष्करप्रमुख जनरल पूर्ण चंद्र थापा यांनाही राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी नवी दिल्ली येथे एका समारंभात भारतीय लष्कराचे मानद जनरल पद बहाल केले होते. नेपाळच्या दौऱ्यावर जनरल नरवणे यांनी लष्कराच्या पॅव्हेलियनमधील शहिद स्मारकाचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. जनरल नरवणे यांना लष्करी मुख्यालयात गार्ड ऑफ ऑनरने मानवंदनाही देण्यात आली. तेथे त्यांनी वृक्षारोपणही केले.