लष्करप्रमुख, हवाईदल प्रमुख आणि नौदलप्रमुख एकाच बॅचचे विद्यार्थी
पुणे – लष्करप्रमुखपदी नियुक्ती जाहीर झालेले लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे, हवाईदल प्रमुख एअरचीफ मार्शल आर.के.एस. भदुरिया आणि नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 56व्या बॅचचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे एकाच संस्थेतून, एकाच वर्षी प्रशिक्षण पूर्ण करून एकत्र बाहेर पडणारे सैन्याधिकारी तिन्ही विविध दलांच्या प्रमुखपदाची धुरा सांभाळणार आहेत.
लष्करप्रमुखपदी नियुक्ती जाहीर झालेले लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे, हवाईदल प्रमुख एअरचीफ मार्शल आर.के.एस. भदुरिया आणि नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह या तिन्ही प्रमुखांचे वडील हवाई दलातील अधिकारी होते. अशाप्रकारचा हा अनोखा आणि बहुदा पहिलाच योगायोग असल्याची चर्चा आहे.
जून 1980 साली हे तिघेही प्रबोधिनीतील आपले प्रशिक्षण संपवून पुढील प्रशिक्षणासाठी दाखल झाले. यापैकी लेफ्ट. जनरल नरवणे आणि एअरचीफ मार्शल भदुरिया हे प्रबोधिनीच्या लीमा तुकडी (स्क्वॉड्रन) मध्ये सहभागी होते, तर ऍडमिरल करमबीरसिंह हे हंटर तुकडीत सहभागी होते. अतिशय कमी बोलणारे, अभ्यासू, शांत आणि तितकेच आक्रमक अशी ओळख असणारे नरवणे, पोहण्यात उत्कृष्ट कामगिरे करणारे ऍडमिरल सिंह आणि फूटबॉल, हॉकी या खेळांमध्ये प्रावीण्य मिळविण्याबरोबरच आपल्या वागण्यातून नम्रतेचा आदर्श देणारे भदुरिया अशी या सर्वांची ओळख होती. यामुळे तिन्ही दलांच्या कार्यामध्ये सुसूत्रता येऊन, दलप्रमुखांच्या परस्पर सामंजस्यामुळे संयुक्त लष्करी मोहिमांमध्ये सैन्याला चांगली कारवाई करणे शक्य होणार असल्याचेही सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.