लष्करही उतरले बचावकार्यात; 300 नागरिकांची सुखरूप सुटका

पुणे – लष्कर परिसरातही अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी भरल्याने शेकडो नागरिक या पाण्यात अडकले होते. ही परिस्थिती पाहता लष्कराकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. यावेळी लष्कराकडून पाण्यात अडकलेल्या 300 नागरिकांची सुखरूप सुटका केली.

मुसळधार पावसामुळे लष्कर परिसरातील भैरोबा नाल्यात क्षमतेपेक्षा अधिक पाणी आल्याने ते पाणी आसपासच्या परिसरात शिरले. यातच बी. टी. कवडे रस्ता, एम्प्रेस गार्डन, चिमटा वस्ती या परिसरांमध्ये पाणी शिरून शेकडो नागरिक या पाण्यामध्ये अडकले होते. याबाबत लष्कर प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती देण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आली नव्हती. यानंतर परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे पाहून लष्करातर्फे बुधवारी रात्री साडेबारा वाजता मदतकार्य सुरू करण्यात आले.

या कामात लष्कराच्या 4 तुकड्या आणि बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुपची 1 तुकडी अशाप्रकारे 157 लष्करी अधिकारी मदतकार्यात सहभागी झाले. पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करत त्यांना तत्परतेने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. यावेळी 2 रुग्णवाहिकादेखील उपलब्ध करण्यात आल्या होत्या. पहाटे 4 वाजेपर्यंत हे मदतकार्य सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.