रायगड – श्रीवर्धनमधील हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीत तीन एके -47 बंदुका असल्याचेही समोर आले आहे. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. ती बोट लेडिहान या ऑस्ट्रेलियन महिलेच्या नावावर असून तिचे पती हे बोटीचे कॅप्टन असल्याची माहिती आहे. सदर बोट मस्कथहून युरोपकडे जात होती. ती नादुरूस्त झाल्याने ती वाहत हरिहरेश्वर किनाऱ्याजवळ आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
दरम्यान, संशयास्पद बोट आणि त्यात शस्त्रास्त्र सापडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सागरी किनाऱ्यावरील पालघर, रत्नागिरी किनाऱ्यावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर, मुंबई, पुण्यात नाकेबंदी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये तीन एके-47 आढळले आहेत. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, मुंबईत 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी समुद्र मार्गे आले होते. त्याशिवाय, मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले आरडीएक्सदेखील श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर उतरवण्यात आले होते. या सगळ्या भूतकाळांतील घटनांचा विचार करता पोलीस प्रशासनाची चिंता वाढली असून तपास सुरू करण्यात आला आहे.