नवी दिल्ली : हरियाणात सरकार बनवण्यासाठी सहा आमदारांची कमतरता असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला दागी आमदार गोपाल कांडा यांच्यासह सात अपक्षांनी पाठींबा दिला आहे. त्यामुळे मनोहरलाल खट्टर यांचे सरकार बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अपक्षांचे मिळालेले पाठबळ घेऊन मनोहरलाल खट्टर हे शुक्रवारी सायंकाळी सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.कॉंग्रेसच्या भुपिंदरसिंग हुडा सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या माजी मंत्री गोपाल गोयल कांडा यांच्यासह धरमपाल गोंडन, नारायण रावत, सोमवीर संगवान, राकेश दौलताबाद, रणधीर गौंडल, बलराज कुंडू आणि रणजित चौताला यांनीही गुरूवारी रात्री भाजपा सरकारला पाठींबाजाहीर केला आहे. त्यानंतर रात्री उशीरा कांडा विशेष विमानाने भअजपाच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी रवाना झाले.
दरम्यान, भोपाळहून हाती आलेल्या वृत्तनुसार, गोपाल कोंडा यांनी दिलेला पाठींबा भारतीय जनता पक्षाने स्वीकारू नये, अशी भूमिका मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी मांडली. त्या म्हणाल्या पक्षाने स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या नेत्यांचा पाठींबा घ्यायला हवा. अपक्ष आमदार गोपाल कोंडा यांनी आमच्या पक्षाला पाठींबा देऊ केल्याचे माझ्या कानावर आले आहे. एका मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्यांच्यावर गुन्हा आहे. या प्रकरणात न्याय मिळत नाही म्हणून तिच्या आईने आत्महत्या केली. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्यात ते जामीनावर बाहेर आहेत. कोंडा दोषी आहेत की नाही हे न्याय प्रक्रिया ठरवेल. मात्र, निवडणुकीतील विजय त्यांना क्लिन चिट देऊ शकत नाही. त्यामुळे नैतिक मुल्यांचा विसर पडू देऊ नका, अशी मी भाजपा सरकारला विनंती करत आहे.आपल्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे प्रभावशाली नेते आहेत. केवळ देशच नव्हे तर जग त्यांच्यासोबत आहे. त्यांनी राष्ट्रीय भावना निर्माण केली. हरियाणात सरकार स्थापन करा. पण कायम लक्षात ठेवा आपल्या सोबत भाजपा कार्यकर्त्यांसारखेच स्वच्छ चारित्र्याचे लोक असायला हवेत.