सुभेदार अजय सावंत यांनी व्यक्त केल्या भावना
पुणे – मराठा युद्ध स्मारक छात्रा वास बेळगावचे माजी विद्यार्थी व भारतीय सैन्य दलातील 61 कॅव्हलरी दलाचे सुभेदार अजय सावंत यांना घोडस्वारी या खेळात केलेल्या स्वप्नवत कामगिरीमुळे अत्यंत मानाच्या अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराने माझ्या आजवरच्या कारकिर्दीचे चीज झाले आहे, अशा शब्दांत सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भारतीय सैन्य दलातील 61 कॅव्हलरीमध्ये 1993 साली ते भरती झाले होते. केवळ याच दलात घोडेस्वारी शिकवली जाते. यापूर्वी हॉकी, फुटबॉल, मल्लखांब या खेळांतही रुची होती. मात्र, त्यानंतर अचानक घोडेस्वारीत कामगिरी करावी असे वाटू लागले व त्यातच आज इतका मोठा पुरस्कार मिळाला.
कर्नल आर. एच. ब्रार यांनी याच खेळात 1984 साली आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्यांनाही हा पुरस्कार मिळाला होता.
अजय यांनी 1994 सालापासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आजवर 200 पेक्षाही जास्त पदके पटकावली आहेत. अर्जुन पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस गेली चार वर्षे केली जात होती. यावेळी मात्र, त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.