तमिळमधील सुपरहिट ठरलेल्या “कोमाली’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेता अर्जुन कपूर झळकणार आहे. चित्रपट निर्माता बोनी कपूर यांनी “कोमाली’च्या रीमेकचे राइट्स मिळविले आहेत. “कोमाली’ एका अशा व्यक्तीची कथा आहे जो कोमातून दिर्घ काळानंतर शुद्धीवर येतो. त्यानंतर परिस्थिती जुळवून घेण्यासाठी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रदीप रंगनाथन यांनी दिग्दर्शित केलेल्या मुळ चित्रपटात जयम रवि, काजल अग्रवाल आणि संयुक्ता हेगडे यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
बोनी कपूर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, आम्ही जगातील सर्व भाषांमध्ये “कोमाली’चे रीमेक अधिकार मिळविले आहे. हिंदी रीमेकमध्ये अर्जुन अभिनय साकारणार आहेत. अर्जुन कपूर सध्या आपल्या आगामी “पानीपत’ चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास अर्जुन लवरकच चित्रपट निर्माता आशुतोष गोवारिकर यांच्या पीरियड ड्रामा असलेल्या “पानीपत’मध्ये झळकणार आहे. यात अर्जुन कपूर मराठा योद्धा सदाशिवराव भाउ यांची भूमिका साकारणार आहे. या वर्षाअखेर डिसेंबर महिन्यात “पानीपत’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात त्याच्यासोबत संजय दत्तही महत्त्वाची भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.