बाटला हाऊस चकमक प्रकरणी आरिझ खानला फाशी

नवी दिल्ली – दिल्लीत 2008 साली झालेल्या बाटला हाऊस चकमक प्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने आरिझ खान याला फाशीची शिक्षा सुनावली. पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांची हत्या आणि या चकमकीशी संबंधित अन्य गुन्ह्यांमध्ये त्याला दोषी ठरवण्यात आले होते. दक्षिण दिल्लीतील जामिया नगरमध्ये 2008 साली झालेल्या चकमकीदरम्यान पोलिसांच्या विशेष विभागातील निरीक्षक मोहनचंद शर्मा यांना वीरमरण आले होते. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश संदीप यादव यांनी सांगितले आणि दोषी आरिझ खान याला फाशीची शिक्षा सुनावली.

आरिझ खान हा इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित दहशतवादी असून पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांची हत्या केवळ हत्या नसून कायद्याचे रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याची हत्या आहे. त्यामुळे हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असून आरिझ खान याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांच्यावतीने अतिरिक्‍त सरकारी वकील ए.टी. अन्सारी यांनी न्यायालयाकडे केली होती.
आरिझ खान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मोहनचंद शर्मा यांना ठार करण्याच्या हेतूनेच गोळीबार केला होता. शर्मा यांच्या हत्येला खान जबाबदार असल्याचे सबळ सिद्ध झाले असल्याचे न्यायालयाने 8 मार्च रोजीच्या सुनवणीदरम्यान सांगितले होते.

बाटला हाऊस चकम्क प्रकरणात दोषी ठरवलेला आरिझ खान हा दुसरा दोषी आहे. या प्रकरणातील एक अन्य आरोपी आणि इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी शहझाद अहमद याला सत्र न्यायालयाने 2013 च्या जुलैमध्ये आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. याशिक्षेला अहमद याने उच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्या अपिलावरील सुनावणी अद्याप उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

बाटला हाऊसची चकमक झाली तेंव्हा आरिझ खान घटनास्थळावरून पळून गेला होता. त्याला नंतर फरार गुन्हेगार घोषित करण्यात आले होते. त्याला 14 फेब्रुवारी 2018 रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर या प्रकरणी खटला चालवला गेला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.