Arijit Singh Retirement News: बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंग याने प्लेबॅक सिंगिंगला अलविदा म्हटल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. एका व्हायरल पोस्टमुळे ही माहिती समोर आली असून, त्यामुळे चाहत्यांमध्ये भावनिक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, अरिजीत सिंगने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक भावनिक संदेश शेअर केला आहे. या संदेशात त्याने चित्रपटांसाठी गाणं गाणं हा आपल्या आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचं म्हटलं आहे. मात्र आता या प्रवासाला थांबवण्याचा निर्णय घेत असल्याचंही त्याने संकेत दिले आहेत. या पोस्टमध्ये अरिजीतने प्लेबॅक सिंगिंगमुळे मिळालेली ओळख, सन्मान आणि प्रेक्षकांचं प्रेम याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. आता संगीताकडे वेगळ्या नजरेने पाहायचं असून, व्यावसायिक ताणतणावापेक्षा आत्मिक समाधानाला अधिक महत्त्व द्यायचं असल्याचंही त्याने नमूद केल्याचं सांगितलं जात आहे. ही माहिती समोर येताच सोशल मीडियावर #ThankYouArijit आणि #ArijitSingh हे हॅशटॅग ट्रेंड करू लागले. अनेक चाहत्यांनी अरिजीतच्या गाण्यांशी जोडलेल्या आठवणी शेअर करत भावना व्यक्त केल्या. काहींनी हा बॉलिवूड संगीतसृष्टीसाठी एका युगाचा शेवट असल्याचंही म्हटलं आहे. Arijit Singh मात्र काही चाहत्यांच्या मते, हा निर्णय म्हणजे पूर्ण निवृत्ती नसून केवळ ब्रेक असू शकतो किंवा पोस्टचा चुकीचा अर्थ काढला जात असावा. व्हायरल संदेशात अरिजीत भविष्यात लाईव्ह परफॉर्मन्स, स्वतंत्र संगीत किंवा आध्यात्मिक रचनांकडे अधिक लक्ष देऊ शकतो, असेही संकेत दिले आहेत. या चर्चांदरम्यान अद्याप अरिजीत सिंगकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही. तरीही या कथित निरोपाने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे, ती म्हणजे अरिजीत सिंग फक्त गायक नाही, तर एक आवाज आहे. त्याचा आवाज जर कधी चित्रपटांतून कमी ऐकू आला, तरी तो संगीतप्रेमींच्या मनात कायम घुमत राहील.