Arijit Singh: आपल्या आवाजाने अवघ्या जगाला वेड लावणाऱ्या अरिजीत सिंगने संगीत क्षेत्राला मोठा धक्का दिला आहे. “मी आता प्लेबैक सिंगिंगला पूर्णविराम देत आहे,” असे जाहीर करत त्याने चित्रपट संगीतातून निवृत्तीची घोषणा केली आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अरिजीतने घेतलेल्या या निर्णयामुळे कोट्यवधी चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. प्रवासाला पूर्णविराम; पण संगीत सुरूच राहणार – अरिजीतने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मी ऋणी आहे. आता मी ठरवले आहे की, प्लेबैक गायक म्हणून मी कोणतेही नवीन काम घेणार नाही. मी या प्रवासाला इथेच थांबवत आहे. हा माझ्यासाठी अतिशय सुंदर अनुभव होता.” एक्स (ट्विटर) वर अधिक स्पष्टीकरण देताना त्याने म्हटले की, “मला एक कलाकार म्हणून अजून शिकायचे आहे आणि स्वतःच्या बळावर स्वतंत्र संगीत निर्मिती करायची आहे. माझे काही जुने करार (Commitments) अद्याप बाकी आहेत, त्यामुळे या वर्षात माझी काही गाणी प्रदर्शित होतील. पण हे स्पष्ट करतो की, मी संगीत बनवणे थांबवलेले नाही.” arijit singh चाहत्यांमध्ये हळहळ – ‘तुम ही हो’ पासून सुरू झालेला अरिजीतचा हा जादुई प्रवास अचानक थांबल्याने सोशल मीडियावर प्रतिकियांचा पूर आला आहे. अनेक चाहत्यांनी “हा भारतीय संगीत क्षेत्रातील एका युगाचा अंत आहे,” अशा भावना व्यक्त केल्या आहेत. अरिजीतने त्याच्या कारकिर्दीत हजारो सुपरहिट गाणी दिली असून तो सध्याच्या काळातील सर्वात महागडा आणि लोकप्रिय गायक मानला जातो. पुढची वाटचाल काय? अरिजीतने जरी चित्रपट गायन (Playback) सोडले असले, तरी तो संगीताशी जोडलेला राहणार आहे. तो आता स्वतंत्र गाणी (Indie Music) आणि संगीत निर्मितीवर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, मोठ्या पडद्यावर आता अरिजीतचा आवाज पुन्हा ऐकू येणार नाही, या विचारानेच त्याचे चाहते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. “नमस्कार, सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते म्हणून तुम्ही इतकी वर्षे माझ्यावर जे प्रेम केले, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, मी आतापासून पार्श्वगायक म्हणून कोणतीही नवीन कामे स्वीकारणार नाही. मी यातून निवृत्ती घेत आहे. हा एक अद्भुत प्रवास होता.” – अरिजित सिंग