ऍड. संजीव पुनाळेकर यांच्या जामीन अर्जावर युक्‍तिवाद

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला संजीव पुनाळेकर यांनी संशयित आरोपींचे वकील म्हणून नव्हे, तर साधक म्हणून दिला आहे, असा युक्‍तिवाद सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी सोमवारी विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात केला. या प्रकरणात सरकारी वकिलांचा युक्‍तिवाद अद्याप बाकी असून, पुढील सुनावणी 19 जून रोजी होणार आहे.

ऍड. पुनाळेकर यांना डॉ. दाभोलकर प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. ते न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर युक्‍तिवाद करताना ऍड. सूर्यवंशी म्हणाले, ऍड. पुनाळेकर यांनी वकिली क्षेत्राची लक्ष्मणरेषा ओलांडून एक साधक म्हणून दुसऱ्या साधकाला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला आहे. डॉ. दाभोलकर यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकर याचा जबाब कर्नाटक एसआयटीने नोंदविला आहे. त्या जबाबात ऍड. पुनाळेकर यांनी पूर्ण शस्त्र नष्ट न करता त्याचे काही सुट्टे भाग करून ठाणे येथील खाडीत फेकून देण्याचा सल्ला दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जे उर्वरित शस्त्राचे भाग दुसऱ्या गुन्ह्यात वापरायचे होते का, असा प्रश्‍न ऍड. सूर्यवंशी यांनी उपस्थित केला.

डॉ. दाभोलकरांच्या खुनापूर्वी दोन दिवस एका मुखपत्रात एक व्यंगचित्र छापून आले होते. त्यात एक माणूस खाली पडला असून तो अंनिस आहे. तर, त्यावर शस्त्राने वार करणारा एक इसम दाखविण्यात आला होता. तर शेजारीच एक झेंडा फडकवताना दाखविण्यात आला होता. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणाऱ्या डॉ. दाभोलकर यांना तुमचा दुसरा गांधी करू, असेही धमकाविण्यात आल्याचे ऍड. सूर्यवंशी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. डॉ. दाभोलकर यांना मारण्यासाठी आरोपींनी संगनमताने मोठा कट रचला होता आणि त्यानुसार त्यांनी तो पूर्णत्त्वास नेल्याने आरोपींवर आयपीसी 120 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून लॅपटॉप, पेन ड्राईव्ह जप्त केले असून त्याचे तांत्रिक विश्‍लेषण करावयाचे आहे. आरोपींना जामीन मिळाल्यास ते पुराव्यात छेडछाड करू शकतात. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)