महापालिकेत भाजप-रिपाइंमध्ये मिठाचा खडा?

उपमहापौरपदावरून पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

पुणे – महापालिकेतील उपमहापौरपदावरून भाजप आणि रिपाइंमध्ये मिठाचा खडा पडला आहे. महापालिकेत रिपाइंकडे कोणतेही मोठे पद नसल्याने तसेच विधानसभेसाठीही पक्षाने भाजपकडे शहरातील कोणत्याही जागेसाठी आग्रह धरला नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीनंतर रिपाइंला देण्यात आलेल्या उपमहापौरपद कायम ठेवावे, अशी मागणी पक्षाने केली होती. मात्र, भाजपने ही मागणी धुडकावून लावत, हे पद आपल्याकडे घेतल्याने या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये महापालिकेतच शाब्दीक चकमक झाली, भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ आणि रिपाइंचे परशुराम वाडेकर यांच्यात हा वाद झाला. मात्र, भाजपने केवळ हे पद एका वर्षासाठी असल्याचे सांगत रिपाइंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असला तरी, कोणतेही आश्‍वासन दिलेले नसल्याचे सांगण्यात आले.

सोमवारी या दोन्ही पदांसाठी अर्ज भरण्यात येणार होते. त्यामुळे दोन दिवसांपासून रिपाइंकडून उपमहापौर पद कायम ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, त्यापूर्वी भाजपच्या नगरसेवकांच्या बैठकीत हे पद आपल्याला मिळणार नसल्याचे लक्षात येताच, विद्यमान उपमहापौर या बैठकीतून बाहेर पडले. त्यामुळे त्यांची समजूत घालण्यासाठी शहराध्यक्षा मिसाळ यांच्यासह भाजप पदाधिकारी धेंडे यांच्या कार्यालयात पोहोचले. त्यावेळी मिसाळ यांनी ही दोन्ही पदे एका वर्षासाठी असून तुम्हाला पुढच्या वर्षी परत पद देऊ, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, या बैठकीतच त्याची घोषणा का केली नाही अशी भूमिका रिपाइंने घेतली. तसेच आम्हाला लेखी द्या मग आम्ही विश्‍वास ठेऊ, अशी मागणी लावून धरली.

तर त्याला प्रत्युत्तर देत तुम्हाला आमच्यावर विश्‍वास नाही का तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल केल्यासारखा बोलता आहात, असे सुनावले. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर मिसाळ या बैठकीतून बाहेर पडण्यासाठी निघाल्या त्यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या दोन्ही नेत्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वादावर तोडगा काढण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्षांना फोन करण्यात आला, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी रिपाइंला पुढील वर्षी पुन्हा हे पद देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर या वादावर पडदा पडला.

शिवआघाडी झालीच नाही…
महापालिका निवडणुकीतही कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेसह मनसेलाही सोबत घेऊन महाशिवआघाडी करण्याची चर्चा सुरू करण्यात आली होती. मात्र, शिवसेनेकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीनेच या दोन्ही पदांसाठी आपले उमेदवार दिले. त्यात राष्ट्रवादीने महापौरपदासाठी तर, कॉंग्रेसने उपमहापौरपदासाठी उमेदवार दिला. दरम्यान, येत्या 22 नोव्हेंबरला होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसे काय भूमिका घेणार यावरही पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.