ब्युनोस आयर्स, (अर्जेंटिना), – कडव्या उजव्या विचारसरणीचे झेवियर माइली यांची अर्जेंटिनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मिआय यांनी अर्थ मंत्री कर्जी मास्सा यांचा पराभव केला. अखेरच्या दिवसापर्यंत प्रचारामध्ये रंगत राहिलेल्या या निवडणुकीमध्ये माइली यांना 55.74 टक्के तर सर्जी मास्सा यांना 44.3 टक्के मते मिळाली, असे अर्जेंटिनाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
अर्जेंटिनामध्ये 1983 मध्ये लोकशाही स्थापन झाल्यापासून अध्यक्षीय निवडणुकीमध्ये हा आतापर्यंतचा सर्वात मोठा फरक राहिला आहे. मध्यरात्रीपर्यंत 99 टक्के मतांची मोजणी पूर्ण झाली होती. त्यावेळी माइली यांचा विजय निश्चित झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी राजधानी ब्युनोस आयर्समध्ये जल्लोष केला.
माइली हे भांडवलवादाचे आणि कडवे उजव्या विचारसरणीचे समर्थक आहेत. त्यांच्या टोकाच्या राष्ट्रवादी भूमिकेमुळे त्यांची तुलना अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली जाते. ट्रम्प यांच्या प्रमाणेच माइली यांनीही आपल्या कारकिर्दीमध्ये अर्जंटिनाची फेरउभारणी करण्याचे सूतोवाच केले आहे.
सत्तारुढ पेरोनिस्ट पार्टीच्यावतीने अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार असलेले अर्थमंत्री मास्से यानी निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच “अर्जंटिनाने आपला वेगळा मार्ग निवडला आहे.’ असे म्हणून आपला पराभव मान्य केला होता.
अर्जंटिनामधील स्थिती अत्यंत खराब आहे. त्यामुळे देशात मोठे परिवर्तन अपरिहार्य आहे. टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्याइतका वेळच शिल्लक राहिलेला नाही. देशाला दारिद्रयापासून स्वातंत्र्य हवे आहे. देशातील राजकीय वर्गाने आता रजा घ्यायला हवी. – झेवियर माइली (अर्जंटिनाचे नियोजित अध्यक्ष)