आखाड पार्ट्या जोरात

-श्रावण दोन दिवसांवर : मांसाहार खरेदीसाठी ग्राहकांचा “पाऊस’
-मागणी वाढल्याने मटणाच्या भावात
-20 रुपयांनी वाढ
-चिकन, मासळीचे भाव मात्र स्थिर
-घटलेल्या उलाढालीस पुन्हा चालना
 
पुणे – आखाड महिन्याचे शेवटचे दोन दिवस उरल्याने चिकन-मटण आणि मासळी खाण्याचा बेत पुणेकरांनी आखला होता. सकाळपासून शहराच्या विविध भागांत दुकानांमध्ये मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने गेल्या दोन दिवसांत मटणाच्या भावात किलोमागे 20 रुपयांनी वाढ झाली तर चिकन आणि मासळीचे भाव स्थिर राहिले.

सणांचा महिना श्रावण शुक्रवारपासून (दि. 2) सुरू होत आहे. या महिन्यात बहुतांश लोक मांसाहार करत नाहीत. त्यानंतर नवरात्र असते. कित्येक लोक तर दिवाळीपर्यंत पुन्हा मांसाहार करत नाहीत. त्यामुळे आषाढात आवर्जून मांसाहार केला जातो. अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने अनेकांनी घरी चिकन-मटणाचे बेत आखले होते. दरम्यान, आखाडाच्या शेवटच्या टप्प्यात शनिवार, रविवारी एकादशी व त्यानंतर सोमवार आल्याने बाजारातील मागणी आणि उलाढाल मंदावली होती. मंगळवारपासून चिकन, मटण व मासळीला खवय्यांकडून मोठी मागणी वाढेल याचा विक्रेत्यांनी आधीच अंदाज बांधला होता. त्यानुसार त्यांनीही मंगळवारी जादा मालाची आवक केली होती. ऐन आखाडात गेल्या तीन दिवसांपासून घटलेल्या उलाढालीस मंगळवारी पुन्हा चालना मिळाल्याचे चित्र बाजारात दिसत होते.

मासळी स्वच्छ करून देणाऱ्यांकडेही रांगा
घरगुती ग्राहकांकडून मासळी खरेदी केल्यानंतर ती कापून तसेच स्वच्छ करून देणाऱ्यांकडेही नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. यामध्ये घरगुती ग्राहकांचे प्रमाण मोठे होते. एका किलोला 20 रुपये दर आकारून मासळी कापून, स्वच्छ करून देण्यात येत होती. गावठी कोंबडा कापून त्याचे तुकडे करून देण्यासाठी चिकन विक्रेत्यांकडून 100 रुपये दर आकारण्यात येत होते.

घाऊक बाजारातील प्रतिकिलोचे भाव
मासळी : पापलेट : 600 ते 1500, सुरमई : 500 ते 700, कोळंबी ः 280 ते 480, बांगडा : 200 ते 280, ओले बोंबील : 240 ते 400. मटण : बोकडाचे : 520 ते 540 , बोल्हाईचे : 520 ते 540 , खिमा : 520 ते 540, कलेजी : 580 ते 600. चिकन : चिकन : 140, लेगपीस : 170, जिवंतकोंबडी : 110, बोनलेस : 240.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)