“पर्यावरणमंत्री आहात ना तुम्ही, कोकणात काय चाललंय बघा जरा’, तुम्ही कधी तरी येता”

पुरग्रस्तांचा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंसमोर संताप

रत्नागिरी : महापुराला एक आठवडा होऊनही इथल्या नागरिकांना राज्य सरकारकडून कोणताही  दिलासा मिळालेला नाही. त्याचा संताप आता चिपळूणकरांमध्ये दिसून येत असून त्याचा फटका गुरुवारी दौऱ्यावर आलेल्या पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना  बसल्याचे पाहायला मिळाले.

शहरात पाहणी करत असताना स्थानिकांनी त्यांना धारेवर धरताना, ‘तुम्ही कधीतरी येता, पर्यावरणमंत्री आहात ना तुम्ही, कोकणात काय चाललंय बघा जरा’, असा उपरोधिक सल्लाही दिला.आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांसाठी मदतही आणली होती. त्यांनी लोकांचे प्रश्नही समजून घेतले.

चिपळूण आणि खेड तालुक्यांमध्ये तातडीने मदतकार्य करण्यात प्रशासकीय यंत्रणा गुंतलेली असतानाच पहिल्या दिवसापासून विविध मंत्र्यांचे दौरे झाल्याने दौरे सांभाळायचे की काम करायचे, या प्रश्नाने प्रशासकीय यंत्रणा हैराण झाली आहे. बुधवार, २१ जुलैपासून गुरुवार, २९ जुलैपर्यंत ११ मंत्र्यांचे दौरे झाले.

बुधवारी २१ जुलै रात्रीपासून बचावकार्यात प्रशासनाच्या विविध यंत्रणा गुंतल्या आहेत. आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी जलदगतीने पंचनामे करण्याचे नियोजन सुरू असतानाच दुसऱ्या दिवसापासून विविध मंत्र्यांचे दौरे सुरू झाले आहेत. आढावा बैठकाच अधिक होत असल्याने दाैरे पुरे करा, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.