पुण्यात लग्न समारंभाची तयारी करत आहात? मग ‘ही’ बातमी वाचाच

लग्नसमारंभाची सीडी पोलीस ठाण्यांत द्यावी लागणार

पुणे – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात लग्न समारंभ अथवा अन्य कार्यक्रमासाठी वाढपी, मदतनीस, वाजंत्री, भटजी, फोटोग्राफर, व्हिडीओ चित्रीकरण करणाऱ्यांसह जास्तीत जास्त 50 व्यक्तींनाच परवानगी राहणार आहे. त्यांच्यामधील अंतर हे सहा फूट राखणे बंधनकारक आहे.

तसेच या 50 व्यक्तींची नावे पोलीस ठाण्यात अगोदर द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर विवाह समारंभ झाल्यावर त्याचे व्हिडिओ चित्रिकरणाची सीडी पाच दिवसांत जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढले आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

ग्रामीण भागामध्ये सद्यस्थितीत करोना बाधित रुग्णांचे वाढता संसर्ग लक्षात घेता त्यावर तात्काळ प्रतिबंध करणे व रुग्णालयीतन व्यवस्थापन अधिक बळकट करुन करोना बाधित रुग्णांचे मृत्यू टाळण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. काही गावांमध्ये लग्न समारंभामुळे करोनाचे रुग्ण वाढल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर लग्न समारंभामध्ये 50 व्यक्तींची मर्यादा पाळण्यात येत नाहीत.

काही लग्नसमारंभामध्ये 150-250 नागरिक उपस्थित असल्याचे दिसून आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून यावर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनांबरोबर नियमावलीच ठरवून देण्यात आली आहे. यामध्ये लग्नसमारंभांमध्ये जेवण करताना समाजिक अंतर राहील, अशा पद्धतीने खुणा कराव्यात. जेवण करताना तसेच मास्क काढून एकमेकांशी गप्पा मारण्यावर निर्बंध आहेत.

लग्नसमारंभासाठी विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, खुले लॉन, सभागृह वापरण्यास परवानगी आहे. या सूचना व नियमांचे पालन करणार असल्याचे हमीपत्र मंगल कार्यालय मालकांना द्यावे लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.