मुंबई – पुणे येथील कार्यक्रमात भाषणावेळी बोलण्याच्या ओघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ म्हणण्याऐवजी “क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर’ असा उल्लेख झाला. त्यानंतर अजित पवार यांनी याबाबत दिलगिरी देखील व्यक्त केली. परंतु आचार्य तुषार भोसले यांनी अजित पवारांवर निशाणा साधत एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तुषार भोसलेंचा समाचार घेत तुम्ही वारकरी तरी आहात का ? असा सवाल उपस्थित केला.
तुषार भोसले यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना अमोल मिटकरी म्हणाले,”शाळीग्राम नावाच्या या माकडाने आता दिवसापन गांजा मारायला सुरुवात केली आहे. हा नेमका कोणत्या पंथाचा आहे ? हे आम्ही याला लवकरच सांगू” अशा खरमरीत शब्दात मिटकरी यांनी भोसले यांच्यावर टीका केली. तसेच भोसले यांना एका मठातून लाथा मारून कसे हाकलून दिले त्याचा व्हिडीओ आमच्याकडे आहे असा इशारा देखील मिटकरी यांनी यावेळी दिला.
कोणताही धंदा नसल्याने हा नेहमीच अजित पवार यांच्यावर बोलत असतो, बोलण्याच्या ओघात आडनाव चुकत असेल तर तीळपापड होण्याचे कारण काय असं मिटकरी यावेळी म्हणालेत. तसेच तू वारकरी तरी आहेस का? असा सवाल विचारात मिटकरी यांनी भोसले यांना झाकणझुल्या म्हंटल आहे.
काय म्हणाले होते नेमकं तुषार भोसले अजित पवारांबाबत
तुषार भोसले म्हणाले, “वाचाळवीर अजित पवार यांनी आधी संभाजी महाराजांच्या मुद्यावरून हिंदूंच्या भावना दुखावल्या आता क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा अपमान केला. आतातरी माफी मागणार की मग्रूरपणे ठाम राहणार असा सवाल उपस्थित करत आर्चार्य भोसले यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता’.