बेळगावातील ‘ते’ मराठी बांधव काय ‘पाकडे’ आहेत ?

शिवसेनेची सामानामधून भाजपवर सडकून टीका

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद हा आता कोणत्या कारणावरून सुरू होईल याचा नेम नसल्याचे दिसत आहे. कारण भाजपच्या राज्यात न्यय मागणाऱ्यांना बंदुकीच्या गोळ्या मिळतात हे आता पक्के झाले आहे, असे म्हणत पुन्हा एकदा शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे. भाजपचे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी सरकार असल्याचे म्हणवून घेते. मग बेळगावात ज्या महाराष्ट्र एकीकरण समितीला गोळ्या घालण्याची भाषा केली जाते ते मराठी बांधव काय पाकडे आहेत? ते हिंदूच आहेत. बेळगावात महापालिकेवर शिवरायांचा, हिंदुत्वाचा भगवा फडकवला म्हणून ती महापालिकाच बरखास्त केली जाते. हेच काय तुमचे हिंदुत्व? आता गोळ्या घालण्याची भाषा सुरू झाली. एकीकरण समितीच्या नेत्यांवर बंदूक रोखणे म्हणजे शिवरायांच्या महाराष्ट्राच्या छातीवर बंदूक रोखण्यासारखे आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे.

दोन दिवसांपूर्वीच कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषीत अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. भाषावार प्रांतरचनेदरम्यान कर्नाटकात अडकलेल्या मराठी भाषिकांना आणि हा लढा सुरू ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून आता शिवसेनेनं निशाणा साधला आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून यावर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला, अशी भाषा कन्नड संघटनेने केली आहे. हे लोक भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत.

कर्नाटकात कोणाचेही राज्य आले तरी सीमा भागातील मराठी मंडळींवरील अन्याय-अत्याचार काही थांबत नाहीत. उलट सत्ताधाऱयांत अत्याचार करण्याची चढाओढच लागलेली असते. आताही कोणी एक भीमाशंकर पाटील व त्याची कर्नाटक नवनिर्माण सेना आहे. त्याने बेळगावात येऊन सांगितले की, सीमा प्रश्नावरून गेली वर्षे बेळगावच्या सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगावच्या सीमेवर थांबवून गोळ्या घातल्या पाहिजेत. त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल. मराठी माणसांना चिरडण्याचे व भरडण्याचे प्रयोग गेल्या वर्षांपासून सुरूच आहेत, असं यात नमूद करण्यात आलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.