नोटा करोनावाहक आहेत का ?

आरोग्य मंत्रालयाकडे मागितले व्यापाऱ्यांनी स्पष्टीकरण..

नवी दिल्ली : चलनी नोटा या करोनाच्या संसर्गाचे वाहक आहेत का, याचा खुलासा आरोग्य मंत्रालयाने करावा, अशी मागणी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडियन ट्रेडर्स (सीएआयटी) या व्यापाऱ्यांच्या सर्वोच्च संघटनेने केली आहे.

नोटा या करोना विषाणूंच्या वाहक असतील तर कोणती काळजी घ्यावी आणि उपाय योजना करावी, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे. त्यामुळे व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकही करोनापासून आपला बचाव करू शकतील, असे या निवेदनात नमूद केले आहे.

सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीय आणि सरचिटणीस प्रविण खंडेलवाल यांनी याबाबतचे निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांत नोटा या करोना विषाणूंचे वाहक असल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे. याबाबतची तीन वृत्ते या निवेदनासह सीएआयटीने जोडली आहेत.

किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजने 2015मध्ये केलेल्या अभ्यासात 96 बॅंकनोट आणि 48 नाण्यांवर विषाणू असल्याचे स्पष्ट केले होते.  2016,मध्ये तामिळनाडूत केलेल्या अभ्यासात डॉक्टर  आणि अन्य व्यावसायिकांकडून गोळा केलेल्या 120 नोटांपैकी 86.4 टक्के नोटांवर संसर्गजन्य विषाणू असल्याचे आढळले होते. तर कर्नाटकातही असाच स्वरूपाच्या केलेल्या अभ्यासात 58 नोटा या विषाणूवाहक असल्याचे स्पष्ट झाले होते.

याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्टता द्यावी. सीएआयटीने बहुतांश व्यापारी हे रोख व्यवहारच करतात. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर आलेल्या नोटा कोणी कोणी हाताळल्या आहेत याची माहिती असणे अशक्‍य असते. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.