संचारबंदीत टेम्पो, कारमध्ये लोकांना कोंबून वाहतूक
शिक्रापूर (वार्ताहर) -राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी असतानाही राज्य शासनाचे नियम पायदळी तुडवड असल्याचा प्रत्यय पुणे-नगर महमार्गावर शनिवारी (दि. 27) दुपारी व रात्री आला. संचारबंदीत अत्यावश्यक सेवा वगळून इतर वाहनांना प्रवासासाठी बंदी असतानाही काही प्रवासी युक्त्या लढवताना दिसून येत आहेत. तर वाहनचालक बक्कळ पैसा मिळतोय म्हणून प्रवाशांची धोकादायकरितीने वाहतूक करीत आहेत. शिक्रापूर पोलिसांनी दोन वाहनांसह तीन चालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
शिक्रापूर पोलिसांनी अशाच प्रकारची युक्ती लढवण्याचा प्रयत्न हाणून पाडला. नाकाबंदी करीत असताना शनिवारी रात्री एका टेम्पोमध्ये चक्क 40 तर दुपारी एका कारमध्ये 11 प्रवासी प्रवास करताना आढळून आले आहे. टेम्पोमधील प्रवासी कामशेतवरून नांदेडकडे तर कारमधील मुंबईहून मध्यप्रदेशकडे निघाले होते. या दोन्हीही वाहनांमध्ये बालके, महिला, पुरुष दाटीवाटीने भरलेले आढळून आले.
टेम्पो चालक संजय चंद्रकांत शिंदे (वय 29 रा. कामशेत, ता. मावळ), तर इको कारचे मालक अब्दुल हमीद सिद्दिकी (रा. चंदननगर, मुंबई) व चालक महम्मद कलीम अब्दुल रशिब (रा. शास्त्रीनगर, मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांचे नावे आहेत. तर शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राजेंद्र दिलीप मदने व हरिभाऊ गजाभाऊ चव्हाण (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती अशी की, शिक्रापूर येथील चाकण चौकात पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस नाईक आप्पासाहेब सूर्यवंशी, ज्ञानदेव गोरे, राजेंद्र मदने, हरिभाऊ चव्हाण, ट्राफिक वार्डन आदेश कुंभार, किरण थोरात, वाहतूक पोलीस कल्पेश राखोंडे हे नाकाबंदी करत असताना एक आयशर टेम्पो (एमएच 14 जेडी 9941) येताना दिसला. यावेळी पोलिसांनी टेम्पोच्या पाठीमागील बाजूस पाहिले असता त्यांना त्या टेम्पोमध्ये तब्बल 40 महिला, पुरुष व बालके दाटीवाटीने बसविलेले आढळून आले. तसेच काहीवेळानंतर एक इकोकार (एमएच 05 एएक्स 4007) या ठिकाणी आली त्याकारमध्ये 11 पुरुष, बालके दाटीवाटीने बसल्याचे आढळून आल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आप्पासाहेब सूर्यवंशी व योगेश पाटील हे करत आहे.