लोकशाहीची चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. अन्यायविरोधात वाचा फोडून सत्य जगासमोर आणणे म्हणजे पत्रकारिता. वंचित, शोषत आर्थिक दृष्या मागस असलेल्या नागरिकांच्या मागणी सरकारदरबारी पोहचवणे म्हणजे पत्रकारिता. सरकार आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणजे पत्रकारिता……अशी काही वाक्य आपण ऐकलेली आहेत. नुकताच ६ जानेवारी रोजी पत्रकारिता दिवस सगळ्यांनी साजरा केला. पण त्याला लागून एक माणूसकीला हादरवून सोडणारी घटना घडली. छत्तीसगडमधील विजापूर येथे राहणाऱ्या एका तरुण पत्रकाराची अत्यंत निर्घूणपणे हत्या करण्यात आली. या हत्येनंतर देशात मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटकात झालेल्या दोन पत्रकारांच्या हत्येच्या घटना ताज्या झाल्या आहेत. त्या हत्येच्या कडू आठवणींचा आढवा….
पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरण
महाराष्ट्रामधील कोकणातील रत्नागिरीमधील शशिकांत वारिसे या तरुण पत्रकाराची ७ फेब्रुवारी २०२३ मध्ये राजापूर पेट्रोल पंपाजवळ दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गाडीने धडक देऊन हत्या करण्यात आली. सुरुवातीला हा अपघात असल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास केला असता, हा अपघात नसून हत्या असल्याचे समोर आले. या अपघात प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास केला आणि रिफानरीचे समर्थन करणाऱ्या समितीच्या अध्यक्षाला अटक करण्यात आली. त्याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. मात्र, स्थानिक नागरिक आणि पत्रकार संघटनाच्या दबावानंतर आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
रिफानरी विरोधी भूमिका
शशिकांत वारिसे हे पत्रकारितेचं काम करत होते. रिफानरी विरोधात त्यांनी राज्य पातळवरीच नव्हे तर देश पातळीवर आपला आवाज बुलुंद ठेवला होता. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी रिफानरी विरोधात आवाज उठवला होता. रिफानरीबद्दलच्या छोट्या घडामोडीही ते समाजापर्यंत पोहचवत होते. त्यांच्या बातम्या थेट आणि अन्यायाला वाचा फोडणाऱ्या होत्या. सरकारपर्यंत बारसू सोलगाव परिसरातील गावकऱ्यांचा आवाज त्यांच्यामुळे पोहोचत होता,अशी माहिती स्थानिक देतात. तसेच या रिफानरी प्रोजेक्टला लोकांचा विरोध होता. मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवासी, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींनी या प्रकल्पाला विरोध सुरुवातीपासून विरोध दर्शवला होता.
स्थानिकांचा विरोध-
सुरुवातीला हा प्रकल्प नाणारला होता. स्थानिकांच्या विरोधानंतर बारासूला हा प्रकल्प हलवण्यात आला. मात्र, तिथेही पुन्हा स्थानिकांनी विरोधच दर्शवला होता. 25 एप्रिल 2023 रोजी या प्रकल्पासाठी माती परिक्षण करण्यासाठी अधिकारी इथे आले, तेव्हा लोकांनी तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले होते. सुरुवातीला शांततेने आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलाने उग्र रुप धारण केले आणि पोलिसांनी अश्रूधुरांचा मारा करीत लाठीचार्ज केला. मात्र, त्या ठिकाणीच लोकं बसून होते. परिस्थिती गंभीर बनली होती. यावरून आरोप प्रत्यारोप करण्यात आले.
महाविकास आघाडीसाठी डोकेदेखी
२०१५ मध्ये तेल शुद्धीकरण म्हणजेच रिफानरीचा प्रोजेक्ट प्रस्ताव मांडण्यात आला. त्यातून इंधनासोबतच अन्य पेट्रोकेमिकल्सची निर्मिती त्यातून केली जाणार होती. हा प्रकल्प महाविकास आघाडीची सत्ता असताना मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरला होता.
गौरी लंकेश हत्याप्रकरण
5 सप्टेंबर 2017 रोजी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्या हत्येनंतर अनेकांकडून निशेष व्यक्त करण्यात आला. या हत्या प्रकरणी एकूण १८ जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला यातून सर्व आरोपींची जामीनावर सुटका झाली असून एक आरोपी फरार आहे. लंकेश यांनी एका भाषणावेळी हिंदूवर केलेल्या वक्त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचे माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार समजते. मात्र, हत्येमागील सूत्रधाराबाबत प्रश्न अद्यापही कायम आहे.
पांगरकरचा पक्षप्रवेश आणि वादंग
माध्यमातून मिळालेल्या माहितनुसार, बंगळुरु येथील जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकरला जामीन मंजूर झाला. त्याने शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केल्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. अनेकांकडून या प्रकरणी संताप व्यक्त करण्यात आला होता. सर्व स्तरातून चौफेर टीका केल्यानंतर त्याची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली.
लंकेश यांच्या भाषणातील काही वाक्य
what is your hindi and hindu drama, what kind of hindulism you belive it अशी काही वाक्य त्यांनी कर्नाटकातील एका कार्यक्रमाच्या भाषणातून केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
कोण होत्या गौरी लंकेश ?
1962 साली जन्मलेल्या गौरी लंकेश या कर्नाटकातील बेंगळुरू येथील पत्रकार आणि सामजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी वडील पी. लंकेश यांनी सुरू केलेल्या लंकेश पत्रिके या कन्नड साप्ताहिकात संपादक म्हणून काम केले. तसेच गौरी लंकेश पत्रिके नावाचे स्वतःचे साप्ताहिकही चालवले होते. आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी बंगळुरूमधील टाइम्स ऑफ इंडियामधून केली. नऊ वर्षे संडे मासिकाची बातमीदार म्हणून त्यांनी काम केले. 2000 मध्ये तिच्या वडिलांच्या मृत्यूच्या वेळी त्यांनी दिल्लीतील Eenadu च्या तेलुगू टेलिव्हिजन वाहिनीसाठी देखील काम केले होते.
तरुण पत्रकार मुकेश चंद्राकार हत्या प्रकरण
छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील पत्रकार मुकेश चंद्राकर या तरुण पत्रकाराची अत्यंत अमानुषपणे् हत्या करण्यात आली. या हत्येच्या घटनेनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. चंद्राकर याची इतक्या क्रूरपणे हत्या केल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. छत्तीसगडमधील बस्तरमध्ये शुक्रवारी (३ जानेवारी) सेप्टिक टँकमध्ये पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक केली. या हत्येचा मास्टरमाईंड निघाला त्यांचाच नातेवाईक सुरेश चंद्राकर. आरोपी हा मुकेश यांचा चुलत भाऊ आहे.
क्रूरतेचा कळस
पत्रकार मुकेश चंद्राकर हे १ जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. ठेकेदार सुरेश चंद्राकर यांच्या आवारातील सेप्टिक टँकमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. त्यांच्या डोक्यावर 15 जखमांच्या खुणा आढळल्या. यकृताचे 4 तुकडे सापडले, मान तुटलेली आणि हृदय तुटले. यावरून हत्या किती क्रूरपणे केली असेल याची कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो. मुकेश यांच्या शरीरावर एवढा जोरदार वार करण्यात आले होते की शरीराच्या अनेक अवयवांना जखमा झाल्या होत्या. यावर बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, मी 12 वर्षात अशी केस कधीच पाहिली नव्हती.
भष्ट्राचार बातमी अन् खून
आरोपी सुरेश चंद्राकर हा व्यवसायाने कंत्राटदार असून राजकारणाशीही त्याचे संबंध असल्याचे सांगण्यात येते. मुकेश यांनी एका रस्त्याच्या कामात झालेल्या भष्ट्राचाराची बातमी दाखवली होती. याचा राग मनात धरुन सुरेश याने मुकेश चंद्राकार यांची हत्या केली. जेवण्याच्या बहाण्याने विजापूर येथील बॅडमिंटन कोर्टाच्या आवारात बोलावले आणि त्याचा भाऊ सुपरवायजरच्या हातून मुकेश यांची हत्या केली.
कोण होते मुकेश चंद्राकर
विविध वृत्तवाहिन्यांमध्ये पत्रकार मुकेश चंद्राकर यांनी पत्रकार म्हणून काम केले होते. तसेच ‘बस्तर जंक्शन’ नावाचे त्यांचे स्वतःचे युट्यूब चॅनेलही होते. एप्रिल २०२१ मध्ये नक्षलवाद्यांनी कोब्रा कमांडोचे अपहरण केले होते. तेव्हा कमांडोला सोडविण्यात मुकेश चंद्राकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मुकेश चंद्राकर यांनी नुकतेच छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील एका रस्ते कामात घोटाळा झाल्याचे उघड केले होते. त्यांच्या बातमीमुळे सदर कामाची चौकशी सुरू करण्यात आली होती. यामुळेच मुकेश चंद्राकर यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
राजकीय वरदहस्त
शशिकांत वारिसे, गौरी लंकेश आणि मुकेश चंद्राकर यांची हत्येने मोठी खळबळ उडाली. अशा घटनांमागे राजकीय वदहस्त असल्याचे आजही बोलले जाते.
पत्रकारांना संरक्षण मिळण्यासाठी कठोर कायदा करणे गरजेचे
पत्रकारांच्या हत्या तर काही पत्रकांवर करण्यात आलेले हल्ले. यामुळे पत्रकारांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात येतो. यामुळे अशा घटनांमध्ये कठारे कायदा करण्याची गरज निर्माण झाली आहे.