पुणे-बलात्काराच्या गुन्हयातील आरोपीला सहकारनगर पोलिसांनी जम्मू काश्मीरमधून जेरबंद केले. अनलॉक सुरु असले तरी रेल्वे सेवा अद्याप सुरळीत झाली नाही. यामुळे पोलिसांना मोटारीने तब्बल 2200 किलोमीटरचा प्रवास करुन जम्मू-काश्मीर गाठावे लागले. शहजाद महंमद रमजाण वाणी(30,रा.कटरा, जम्मु) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी तरुणी 2015 मध्ये पुण्यात बीटेकचे शिक्षण घेत होती. तर आरोपी हा एमबीए करत होता. त्यांची ओळख फेसबुकवरुन झाली होती. यानंतर प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांच्यात मैत्री झाली. शहजादने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत पुण्यात आणी कटरा येथे नेऊन शारीरीक संबंध ठेवले.
यानंतर तरुणीने लग्नाची विचारणा करता तीला लग्नास नकार देत शारीरीक संबंधाची छायाचित्रे सोशल मिडियावर टाकण्याची धमकी दिली. ही धमकी दिल्यावर तीच्याशी अनेकदा शारीरीक संबंध ठेवले. हा प्रकार 2017 पर्यंत सुरु होता. दरम्यान 2 जूलै 2020 रोजी तरुणीने सहकारनगर पोलिस ठाण्यात बलात्काराची फिर्याद दाखल केली. मात्र लॉक डाऊन असल्याने देशभरातील वाहतूक बंद होती. यामुळे आरोपीला अटक करण्यासाठी जम्मुला जाणे शक्य नव्हते. सध्या परिस्थिती निवळली असली तरी रेल्वे सेवा मर्यादीतच सुरु झालेली आहे. यामुळे पोलिसांच्या पथकाने मोटारीतून जम्मू गाठण्याचा निर्णय घेतला.
पोलिस उपनिरीक्षक गौरव सुहास देव, पोलिस अंमलदार संदीप सोनबा जाधव ,भुजंग परशुराम इंगळे यांच्या पथकाने तब्बल 2200 किलोमीटरचा प्रवास करुन जम्मू गाठले. तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला जेरबंद केले. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त एन.डी.चव्हाण, उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली