मुंबई : राज्यात सुरु असणाऱ्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देत असताना सर्वांचा समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका देखील केली. “काही लोक तर सरळ म्हणतात मी मास्क घालणार नाही. अरं बाबा तुला काही कोरोना होणार नाही. पण तुझ्यामुळे दुसर्याला होईल त्याचं काय? दरेकर असे कसे तुमचे जुने नेते?” असे म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
“मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी “मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय”, असं उत्तर राज ठाकरेंनी पत्रकारांना दिलं होतं. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विधानपरिषदेत राज ठाकरे यांना टोला लगावला. अजित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनाही सोडलं नाही. दरेकरांचं जॅकेट बघूनच कोरोना त्याच्या जवळ गेला नसेल असं म्हणत सभागृहात हसायला लागले.
“एका गोष्टीचं मला विशेष वाटतं की मुख्यमंत्र्यांना, दरेकरांना आणि सभापती महोदयांना कोरोना झाला नाही. विधानसभेत मलाही झाला, फडणवीसांनाही झाला. तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे तुम्हाला झाला नसेल. किंवा प्रवीण दरेकर यांचे जॅकेट बघून तो जवळ गेलाच नसेल, म्हटला असेल कुठं जाकिटातून आत शिरायचं, असंही काही झालं असेल तर माहित नाही,” असे अजित पवार म्हणाले.
“तिघांनाही कोरोना होऊ नये अशा आमच्या शुभेच्छा असतील. नाहीतर उद्या कोरोना झाला तर म्हणतील तुझीच दृष्ट लागली आणि म्हणून कोरोना झाला, असे म्हणून माझ्या नावावर पावती फाडू नका,” असे म्हणत अजित पवारांनी टोमणा मारला. तितक्यात मागून एका सदस्याने ‘प्रसाद लाड यांनी ज्यांना ज्यांना जॅकेट दिलं, त्यांना कोरोना झाल्याचं म्हणताच अजित पवारांनी प्रसादने मलाही जॅकेट दिलं होते,’ असे सांगितले.