एसपींनी ठेवल्या एकाच म्यानात दोन तलवारी; बदली नाट्याने चर्चेला उधाण
सातारा – सातारा जिल्हा पोलीस दलात कारभारी बदलाच्या घडामोंडीनी अख्खे पोलीस दल ढवळून निघाले. सोलापूर ग्रामीणवरून आलेल्या सर्जेराव पाटलांनी “एलसीबी’चा चार्ज घेतल्याने विजय कुंभारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मात्र, एसपींनी कुंभार यांच्या भविष्यातील बंडाची दिशा ओळखून त्यांनाही त्याचठिकाणी राहण्याचे आदेश दिले. अखेर अपेक्षेप्रमाणे पाटीलांनी “एलसीबी’ची सुत्रे हाती घेत कामाला सुरूवात केली, तर कुंभार यांनी सुट्टीचा अर्ज देत अप्रत्यक्ष बंडाचे निशाण फडकावल्याने एकाच म्यानात दोन तलवारी ठेवण्याचा जिल्हा पोलीस अधीक्षकांचा प्रयोग तुर्तास तरी फसल्याचे बोलले जात आहे.
सोलापूर ग्रामीणवरून 30 नोव्हेंबर 2018 रोजी सातारा पोलीस दलात दाखल झालेल्या विजय कुंभार यांना तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी दिली. त्यानंतर कुंभार यांनी कराड तालुक्यातील बॅंकेवरील दरोडा, सिध्देश्वर कुरोली येथील दरोडा, तडवळे येथील दरोडा कौशल्याने उघडकीस आणला. दरोड्यांसोबतच त्यांनी खुनाचे अनेक गुन्हे उघडकीस आणत आरोपींना जेरबंद केले होते. असे असतानाही कुंभार यांच्या जागी पाटील यांची वर्णी लागणे हे किमान पोलीस दलासाठी तरी आश्चर्याचेच आहे. त्यांना दुय्यम दर्जाची नेमणूक नेमकी कोणत्या कारणांनी दिली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
त्याचे कारण कुंभार यांचा तापट स्वभाव. त्यातच त्यांनी नेहमीच वरिष्ठांच्या आदेशापेक्षा स्वत:च्या मनाचे जास्त ऐकले. याचा फायदा त्यांना गुन्हे उघडकीस आणताना झालाही असेल, पण व्यवस्थेत वावरताना नक्कीच झाला नाही. त्याचा परिणाम त्यांच्या जागी सर्जेराव पाटील यांच्या बदलीच्या रुपाने जिल्ह्याने पाहिला. खरे तर पोलीस दलच काय पण इतर कोणत्याही विभागातील बदल्यांचा यापूर्वी कधीच इतका बोभाटा झाला नव्हता. मात्र, सोलापूर ग्रामीणवरून येतानाच पाटील यांनी आपण सातारा एलसीबीसाठी जात असल्याचे सांगितल्याने ही बदली ठरल्याप्रमाणे होत असल्याच्या चर्चा खुद्द पोलीस दलातच सुरू झाल्या होत्या.
त्यादरम्यान कुंभार यांनी दिलेला जिल्हा बदलीचा अर्ज, त्यानंतर कुंभार यांनी बंद करून ठेवलेला फोन, कुंभार यांना इतरत्र कुठेही बदली न देता एलसीबीला दुय्यम स्थानावर दिलेली नेमणूक या सगळ्या घडामोडींमुळे या बदलीच्या चर्चा पोलीस दलात आणि त्यानंतर समाजात सुरू झाल्या. ज्यावेळी पाटील शुक्रवारी एलसीबीचा चार्ज घेत होते नेमके त्याचवेळी कुंभार आयजींच्या दरबारात आपले गाऱ्हाणे मांडत होते. कुंभार यांच्या भविष्यातील हालचाली लक्षात घेता, तसेच कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून एसपींनी कुंभार यांची नेमणूक एलसीबीतच केली.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एलसीबी नावाच्या म्यानात कुंभार आणि पाटील या दोन तलवारी ठेवण्याचा प्रयोग केला. मात्र, कुंभार यांना हे पटले नसल्याने त्यांनी थेट सुट्टीवर जात बंडाचे निशाण फडकावल्याचे बोलले जात आहे. तर या सगळ्या वादापासून चार हात लांब राहत आपल्याला यातील काही माहित नसल्याचे सांगत सर्जेराव पाटील कामाला लागले आहेत. खरे तर हा पोलीस दलाचा अंदर का मामला असला तरी त्यांचा समाजाशी येत असलेला रोजचा संबंध याचा विचार करता हे समाजासमोर येणे तितकेच महत्वाचे आहे.