एप्रिल तापणार..! पुण्यासह राज्यात तापमानवाढीचे संकेत

पुणे -पुण्यासह संपूर्ण राज्यात येत्या आठवडाभरात तापमानाचा पारा वाढणार असून, घराबाहेर पडताना नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. 

राज्यात सध्या आकाश निरभ्र असून, हवामान कोरडे असल्याने उन्हाचा तडाखा वाढत आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढला असून, पुण्यासह बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाने चाळिशी ओलांडली. 

त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत तापमानात किंचितशी घट झाली होती; मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा तापमानवाढ असून, पुढील आठवडाभर तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. 

त्याचबरोबर महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टी आणि लगतच्या भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, परिणामी अंशत: ढगाळ वातावरण अनुभवायला मिळेल, असेही विभागातर्फे सांगण्यात आले आहे. रविवारी जिल्ह्यात 38 अंश सेल्सिअस कमाल, तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद घेण्यात आली. 

कमाल तापमान सरासरीच्या जवळपास आहे. राज्यात सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी येथे 43.4 अंश सेल्सिअस तर सर्वांत कमी तापमान महाबळेश्‍वर येथे 18.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे.

विदर्भात लाटेचा इशारा
विदर्भात बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाने चाळिशीचा पारा ओलांडला असून, या भागातील तापमान आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रतही तापमान वाढणार असल्याचे संकेत आहेत.

बाहेर पडताना काळजी घ्या
नागरिकांनी शक्‍यतो सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन या कालावधीत घराबाहेर पडणे टाळावे. जाणे अनिवार्य असल्यास पुरेशी काळजी घेऊन घराबाहेर पडावे अशी सूचना देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.