तहानलेल्या निमसाखरमध्ये पाणी योजना मंजूर

निमसाखर – येथे गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न प्रलंबित होता. नुकतेच गावची पाणी योजना माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नातून पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी गावासाठी 10 कोटी 81 लाख रुपयांच्या योजनेस मंजुरी दिली आहे.

गावची पाच हजार लोकसंख्या असून गावालगत चार ते पाच मोठ्या लोकसंख्येच्या वाड्या-वस्त्या आहेत. तहानलेल्या गावासाठी शासनाकडून वेळोवेळी या मुद्दयाची ग्रामपंचायत पातळीवर पूर्तता केली होती. मात्र, योजनेस मान्यता मिळत नव्हती. अनेक महिन्यांपासून ग्रामपंचायतीकडून माजी सहकारमंत्री पाटील यांच्या मदतीने माजी सरपंच सदस्य गोंविद रणवरे हे प्रयत्नशील होते.त्यानुसार मंत्री लोणीकर यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत पेयजल योजनेला 10 कोटी 81 लाख रुपयांची मंजुरी दिली. ही माहिती पाटील यांनी दिल्याचे पंचायत समितीच्या सदस्या सुवर्णा रणवरे यांनी सांगितले.

योजनेत नीरा डाव्या कालव्याच्या 54 फाट्यातून 1 फूट बंद लोखंडी पाइपने 9 किलोमीटर अंतर कापत हे पाणी उताराने येणार आहे. हे पाणी गावाजवळील गायरानातील 3 एकर क्षेत्र योजनेसाठी ग्रामपंचायतीला जागा मिळाली आहे. या ठिकाणीच 3 कोटी 20 लाख खर्चून आरसीसीमध्ये साठवण तलाव होणार आहे. पाणी शुद्ध करीत नव्याने बांधण्यात येणाऱ्या टाकीतून वाड्या- वस्त्या व गावाला पाणी दिले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.